पनवेलमध्ये खड्ड्यांचे विघ्न

पावसाच्या उसंतीनंतर रस्त्यांची दुरवस्था ऐरणीवर

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्याने उकाडा वाढला असून नागरिक आता पुन्हा पावसाची प्रतीक्षा करत आहेत. दुसरीकडे, पावसाच्या तडाख्यानंतर पनवेल परिसरातील रस्त्यांची दुरवस्था समोर आली आहे.

पनवेलमधील कच्छी मोहल्ला परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. खड्डे चुकवत वाहन चालवण्याची अक्षरशः स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र दररोज पाहायला मिळत आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

एम. जी. रोडवरील ड्रेनेज लाईनच्या झाकणांलगतही मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे तात्पुरते बुजवण्यासाठी टाकण्यात आलेली मोठी खडी वाहनांच्या चाकाखाली उडून रस्त्यालगतच्या दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक पादचारी आणि वाहनचालक उडणाऱ्या खडीमुळे किरकोळ जखमी झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

व्यापाऱ्यांचे नुकसान होत असून धूळ आणि खडीमुळे ग्राहकांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळा अद्याप संपलेला नसताना तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी डांबरीकरण करून धोकादायक खड्डे त्वरित बुजवावेत, अशी जोरदार मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात येत आहे.

Exit mobile version