महापालिका निवडणुकीत फटका बसणार
| मुंबई | प्रतिनिधी |
विधानसभा निवडणुकीत उत्तर भारतीयांनी भाजप महायुतीला पाठिंबा देत मतदान केले. नवीन मंत्रिमंडळात उत्तर भारतीय आमदाराला मंत्रिपदाची संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती; मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यांच्या नाराजीचा फटका येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत बसेल, अशी शक्यता व्यक्त होत आहे.
चार आमदार असतानाही उत्तर भारतीयांची मते मागणार्या भाजपने एकाही आमदाराला मंत्री केले नाही. त्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये नाराजी असून, त्याचा परिणाम महापालिका निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे. मागच्या वेळी उत्तर भारतीय अभ्यासक जयप्रकाश ठाकूर यांना संधी दिली होती; मात्र यावेळी त्यांचे कार्डही कापण्यात आले. विधान परिषदेत भाजपचे ज्येष्ठ आमदार राजहंस सिंह, गोरेगावमधून विद्या ठाकूर, बोरिवलीतून संजय उपाध्याय आणि वसई-विरारमधून स्नेहा दुबे यांना मंत्रिमंडळात निश्चितच संधी मिळेल, असे सांगितले जात होते; मात्र यापैकी कुणालाही संधी दिली नाही. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने उत्तर भारतीयांमध्ये नाराजी आहे.
मुंबईतून मंगलप्रभात लोढा आणि आशीष शेलार यांनाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. मुंबईतील काही भागांत हिंदी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने हे उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक पॉकेट्स म्हणून ओळखले जाते. दहिसर, बोरिवली, मुलुंड, जोगेश्वरी, अधेरी, चांदिवली, कलिना हे हिंदी भाषिकांचे सर्वात मोठे पॉकेट्स म्हणून ओळखले जातात. याशिवाय कुर्ला, मालाड, कांदिवली, मानखुर्द-गोवंडी, वांद्रे, साकीनाका, मालवणी येथे अलीकडे हिदी भाषिकांची संख्या वाढली आहे. हिंदी भाषिकांचा वाढता प्रभाव2011 च्या जनगणनेनुसार मुंबईत हिंदी भाषिकांचा आकडा हा 40 टक्क्यांनी वाढला आहे. निवडणुकांमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये हिंदी भाषिकांची मते निर्णायक ठरत आहेत. शिवाय, 2011 नंतर हिंदी भाषिकांच्या संख्येत आणखी आठ ते 10 लाखांची भर पडल्याची शक्यता राजकीय अभ्यासक वर्तवत आहेत.