जिल्हाभरात हजारो गणेशमूर्तींची होणार प्राणप्रतिष्ठा
गणेशभक्तांच्या सुरक्षेसाठी पोलीस यंत्रणा सतर्क
| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्ह्यात बाप्पाचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. या कालावधीत लाखोंच्या संख्येने गणेशभक्त कोकणात दाखल होत असतात. त्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच हा आनंदोत्सव शांततेत आणि सुरळीत साजरा व्हावा, यासाठी रायगड जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे.
रायगड जिल्ह्यात 19 सप्टेंबरपासून घराघरात गणरायाचे आगमन होणार आहे. सार्वजनिक 271 व खासगी एक लाख दोन हजार 581 गणपती बाप्पा विराजमान होणार आहेत. तर, 14 हजार 445 गौरींची मूर्ती, मुखवटे आदींची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सव आनंदात साजरा करता यावा यासाठी पोलिसांनी गावागावात जाऊन जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन करण्यास सुरुवात केली आहे. एकूण 493 ठिकाणी गाव बैठका सुरु केल्या आहेत. त्यात 120 ठिकाणी शांतता कमिटी, 105 ठिकाणी मोहल्ला कमिटी व 120 ठिकाणी गणेश मंडळ बैठका घेऊन हा सण आनंदमय वातावरणात साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
फौजफाटा तयार
9 पोलीस उपअधीक्षक, 27 पोलीस निरीक्षक, 114 सहाय्यक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक, 1300 अंमलदार, 500 होमगार्ड, एक एसआरपीएफ कंपनी, 30 अधिकारी, 300 पोलीस अंमलदार यांच्यामार्फत गस्त वाढवली जाणार आहे. यासाठी दोन हजारांपेक्षा अधिक पोलीस नेमण्यात आले आहेत.
दर दहा किलोमीटरवर सुविधा कक्ष
कोकणात जाणार्या चाकरमान्यांसह रायगडात येणार्या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक दहा किलोमीटरवर सुविधा कक्ष स्थापन करण्यात येत आहे. खारपाडा ते कशेडी मुंबई-गोवा महामार्गावर खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापूर येथे सुविधा केंद्र असणार आहेत. त्यात चहापान कक्ष, वैद्यकीय कक्ष, पोलीस मदत केंद्र, बालक आहार कक्ष, वाहन दुरुस्ती कक्ष तसेच फोटो गॅलरी असणार आहे.
तिसर्या डोळ्याची नजर
गणेशोत्सवात गर्दीचा फायदा घेत महिलांची छेडछाड करणे, पाकीट लंपास करणे, महिलांचे दागिने चोरणे अशा घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या सूचना मंडळाला देण्यात येणार आहेत. विसर्जनस्थळी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
दुचाकीवरून राहणार गस्त
रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. त्यात सिमेंट काँक्रिटीकरणदेखील सुरू आहे. गणेशोत्सवानिमित्त 16 सप्टेंबरपासून कोकणात व रायगड जिल्ह्यात जाणार्या प्रवाशांना वाहतूक कोंडीचा फटका बसू नये यासाठी प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर दुचाकीची गस्त राहणार आहे. प्रत्येकी दुचाकीसोबत दोन अंमलदार असणार आहेत. त्यासाठी 40 दुचाकींसह 160 पोलीस असणार आहेत. त्यात 30 अधिकार्यांसह 130 अंमलदारांचा सहभाग राहणार आहे.
गावगुंडाच्या मुसक्या आवळल्या
जिल्ह्यातील एक हजार 253 जणांविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. एटीबी, एटीसी पथक नेमण्यात आले आहे. सोशल मीडियावर देखरेख ठेवण्यासाठी सायबर सेलसाठी एक पोलीस अधिकारी, पाच पोलीस अंमलदारांची नेमणूक करण्यात आली आहे.