वाहनांसाठीचा राज्यस्तरीय ठेका बंद
| अलिबाग | प्रमोद जाधव |
राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील हजारो शाळा, अंगणवाड्यांमध्ये जाऊन लाखो विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. परंतु, या उपक्रमाला गाड्यांच्या अभावी ब्रेक लागला आहे. डॉक्टर, परिचारिका व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांची, औषधांची वाहनाद्वारे ने-आण करणाऱ्या एजन्सीने गाड्या पुरविणे बंद केले आहे. राज्यस्तरीय ठेका दिलेल्या मुंबईतील एका ट्रॅव्हल्स कंपनीला जुन्या दराने वाहने पुरविणे परवडत नाही. त्यामुळे या कंपनीने गाड्या देणे बंद केले आहे. त्याचा परिणाम रायगड जिल्ह्यातील चार लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्याने बालस्वास्थ्य बिघडण्याचे चित्र आहे.
अंगणवाडीतील बालकांसह शाळा, महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून, त्यांना निरोगी जीवनशैली जगता यावे, यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य योजना सुरु करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्यावर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केली जाते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम विद्यार्थ्यांना आरोग्य सेवा आणि सुविधा पुरवण्यासाठी एक महत्त्वाची योजना मानली जाते. या योजनेत शून्य ते 18 वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्याची तपासणी केली जाते. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम भारत सरकारचा एक उपक्रम आहे. शाळा-महाविद्यालयांतील मुला-मुलींची शारीरिक तपासणी, डोळे, कान, नाक, घसा, त्वचा आणि इतर आरोग्य समस्यांची तपासणी नियमित केली जाते. तपासणीमध्ये आढळलेल्या आरोग्य समस्यांवर औषधोपचार, शस्त्रक्रिया किंवा इतर आवश्यक उपचार केले जातात. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, औषध निर्माता व औषधांचा साठा वाहनांद्वारे घेऊन शाळांमध्ये हा कार्यक्रम राबविला जात होता. मुंबई येथील दत्तगुरू ट्रॅव्हल्स या कंपनीला गाड्या पुरविण्याचा राज्यस्तरीय ठेका दिला होता. या ट्रॅव्हल्समार्फत वाहनांचा पुरवठा केला जात होता. शाळा, अंगणवाडी, महाविद्यालयात या गाड्यांद्वारे जाऊन वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती.
रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन चार लाख विद्यार्थ्यांची तपासणी केली जात होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे स्वास्थ्य राखण्यास मदत झाली होती. परंतु, या एजन्सीला आता जुन्या दराने वाहनांचा पुरवठा करणे परवडत नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच कंपनीने वाहनांचा पुरवठा करणे बंद केले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होण्यास अडथळा निर्माण झाला आहे. वाहने उपलब्ध नसल्याने डॉक्टरांना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील बालस्वास्थ्य योजना बिघडली असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील शाळा सुरु होऊन दोन महिने होत आली आहेत. मात्र, अजूनपर्यंत काही दूरच्या शाळा, अंगणवाड्यांपर्यंत अधिकारी पोहोचले नसल्याची माहिती समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात चार हजार अंगणवाड्या असून, जिल्हा परिषद, माध्यमिक, उच्च माध्यमिकच्या तीन हजारांहून अधिक शाळा, महाविद्यालये आहेत. या शाळेतील चार लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचताना अडथळा निर्माण झाला आहे.
चार महिन्यांत 34 हजार विद्यार्थ्यांची तपासणी
पूर्वी वाहनांची मदत घेऊन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना शाळा, अंगणवाड्यांमध्ये पोहोचविण्याचे काम केले जात होते. परंतु, मार्चपासून ठेकेदारांनी गाड्यांची सेवा देणे बंद केले. त्यामुळे लांब असलेल्या शाळांपर्यंत वैद्यकीय अधिकारी यांना पोहोचता येत नाही. ही योजना बंद पडू नये, म्हणून जवळच असलेल्या अंगणवाडी, शाळांमध्ये डॉक्टरांनी जाऊन भेटी दिल्या आहेत. एप्रिल ते जुलै या कालावधीत 34 हजार विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.
93 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया
बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत सात विद्यार्थ्यांचे हृदयाचे, तर इतर 86 विद्यार्थ्यांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ज्या शाळांमध्ये जाण्यासाठी गाड्यांची गरज नाही, त्या शाळा, अंगणवाड्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केल्याची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आली.
विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी भारत सरकारकडून राष्ट्रीय बाल स्वास्थ उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून अंगणवाडी, शाळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. लांब पल्ल्यातील शाळा, अंगणवाड्यांना भेटी देण्यासाठी जिल्हास्तरावर नियोजन करण्याच्या सूचना शासनाकडून आल्या आहेत. त्याची प्रक्रिया सुरु आहे. दहा ते पंधरा दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून नियमित आरोग्य सेवा शाळांमध्ये दिल्या जातील.
डॉ. निशिकांत पाटील,
जिल्हा शल्यचिकित्सक, रायगड






