महागृहनिर्माण योजनेची संगणकीय सोडत
। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
सिडको महामंडळाच्या महागृहनिर्माण योजना ऑगस्ट- 2022 करीता संगणकीय सोडत सिडको भवन येथील सिडको सभागृहामध्ये काढण्यात आली. सिडकोतर्फे 31 ऑगस्ट 2022 रोजी या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात येऊन नवी मुंबईच्या विविध नोडमधील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील उपलब्ध 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती.
सदर संगणकीय सोडत प्रक्रियेवर देखरेख करण्याकरिता सिडकोतर्फे माजी लोकायुक्त सुरेश कुमार,यांच्या पर्यवेक्षणाखाली समिती नियुक्त करण्यात आली होती,मोईझ हुसेन हेही या समितीतील एक सदस्य होते. सोडतीमध्ये घर लाभलेल्या अर्जदारांनी सिडकोमुळे नवी मुंबईसारख्या सोयी सुविधांनी परिपूर्ण शहरात आपल्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना यावेळी बोलून दाखवली.
सिडको महामंडळातर्फे नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती. परवडणार्या दरातील या 4,158 घरांपैकी 404 घरे (उत्पन्न मर्यादा – 0 ते 3 लाख) ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित 3,754 घरे (उत्पन्न मर्यादा -3 लाखांपेक्षा अधिक) ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध करून देण्यात आली होती.
या महागृहनिर्माण योजनेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळून सुमारे 16,000 अर्ज प्राप्त झाले. महागृहनिर्माण योजनेकरिता ऑनलाइन अर्ज करण्यास 03 ऑक्टोबर 2022 ही अंतिम तारीख होती. परंतु, अधिकाधिक नागरिकांना योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणीस 03 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय सिडकोकडून घेण्यात आला होता. यामुळे सुमारे 4 हजारांहून अधिक कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणे शक्य झाले.
सिडकोतर्फे गृहनिर्माण योजनेच्या संगणकीय सोडतीसाठी वापरण्यात येणारी प्रणाली (सॉफ्टवेअर) ही पूर्णत: मानवी हस्तक्षेपविरहित आहे. तसेच भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मुंबई येथील संगणक विभागाकडून या प्रणालीची तपासणी करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे काढण्यात येणार्या सोडत प्रक्रियेमध्ये अर्जदारांमधील निवडक प्रतिनिधींना पंच म्हणून सहभागी करून घेतले जाते. तसेच सोडती दरम्यान पात्र अर्जदारांच्या आणि सदनिकांच्या यादीची यादृच्छिक पद्धतीने सरमिसळ करण्यात येते. अत्यंत पारदर्शक व निष्पक्ष अशा या प्रक्रियेद्वारे सर्व अर्जदारांना समान संधी सुनिश्चित करण्यात येते.
महागृहनिर्माण योजना दिवाळी- 2022 अंतर्गत वेगाने विकसित होत असलेल्या उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व 2 ए, खारकोपर पूर्व 2 बी आणि खारकोपर पूर्व पी 3 येथे 7,849 सदनिका प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या गृहनिर्माण योजनेद्वारे रेल्वे, महामार्ग, एमटीएचएल यांद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेल्या व आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सान्निध्यात उलवे नोडमध्ये हक्काचे घर घेण्याची संधी नागरिकांना प्राप्त झाली आहे.