| उरण । वार्ताहर ।
तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवर वाढलेल्या गवतामुळे वळणांवर समोरून येणारी वाहने दिसत नसल्याने चालकांची तारांबळ उडत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार होत असून उरण परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर अपघातांचा धोका बळावला आहे.
उरण तालुक्यात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित असलेले बहुतांश रस्ते उरणच्या पूर्व विभागाशी जोडले आहेत. त्यात चिरनेर-आवरे मार्ग, खोपटा-केळवणे खारपाडा, चिरनेर-खारपाडा अशा वर्दळीच्या मार्गांचा समावेश आहे. या रस्त्यावरील दोन्ही बाजूला पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता अरुंद झाला असून एकाचवेळी दोन वाहने जाणे कठीण झाले आहे. तसेच समोरासमोर येणार्या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे या रस्त्यावरील वाढलेले गवत कापण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.
उरण परिसरातील अनेक रस्त्यांवर गवत वाढले आहे. यासाठी निधी मंजूर झाला आहे. त्याचे काम लवकर पूर्ण केले जाईल.
नरेश पवार
उप-अभियंता, सा. बां.