स्विगीच्या गोदामात अस्वच्छतेचे साम्राज्य

। ठाणे । प्रतिनिधी ।

भिवंडीतील स्विगीच्या गोदामात जीवनावश्यक वस्तू खाद्यपदार्थांचा साठा असताना तेथे उंदीर, झुरळ यांचा सुळसुळाट असल्याचे आढळून आले आहे. मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या गोदामाला भेट देऊन त्याची दखल घेण्याची सूचनाही अन्न औषध प्रशासनाला केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी ग्रामीण भागातील सावद नाका जानवल येथे स्विगीचे मोठे गोदाम आहे. येथील ग्राहकांना इतर गोदामांच्या माध्यमातून साहित्य, अन्न पदार्थ पोचते केले जातात. मागील दोन दिवस एक उंदीर या गोदामात मरून पडला होता, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्विगी प्रशासनाने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. त्याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी या गोदामाला कार्यकर्त्यांसह धडक दिली. स्विगीच्या मुख्य गोदामात अस्वच्छतेचे साम्राज्य असून उंदीर, झुरळांचा सुळसुळाट असतो. अन्न पदार्थांची पाकिटे फुटून इतस्ततः पसरलेली असतात. लोकांना देण्यात येणार्‍या खाद्यपदार्थांचा साठा ज्या ठिकाणी केला जातो, ते ठिकाण एवढे अस्वच्छ आहे की नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली.

तसेच, जाधव यांनी गोदामातील कंपनी अधिकार्‍यांना बोलावून त्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे. तसेच, गोदाम सील करण्याचा देखील इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकार्‍यांना कळवले असता कोणीच वेळेवर दखल घेतली नसल्याची खंतही जाधव यांनी व्यक्त केली आहे.

Exit mobile version