माणगावात एक्सप्रेस रेल्वेला हवा थांबा

प्रवाशांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष, थांबाच नसल्याने पर्यटकांची कुचंबणा

| माणगाव । प्रतिनिधी |

जागतीक दर्जाच्या दिल्ली मुंबई इंडस्ट्रीयल कॉरोडोरमुळे माणगाव शहर जगाच्या नकाशावर पोहोचले आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक, पर्यटक, विद्यार्थी रेल्वेने जास्त प्रवास करतात. माणगाव रेल्वे स्थानकात लांब पल्याच्या व महत्वाच्या एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा नसल्यामुळे हजारो पर्यटक-प्रवाशांची कुचंबणा होत आहे. या रेल्वे स्थानकावर सर्व एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा यासाठी विविध संस्था, संघटना, राज्यकर्ते यांनी अनेक वेळा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना निवेदने दिली. मात्र या निवेदनाला कोकण रेल्वे प्रशासनाने केराची टोपली दाखवली. याबाबत प्रवाशातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण व दुपदरीकरण झाल्यामुळे कोकण रेल्वेला अधिक महत्व आहे. माणगाव रेल्वे स्थानक ते मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस अशी लोकल रेल्वे सुरु करावी अशी मागणी ही प्रवासी नागरीकातून होत आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गामुळे दक्षिण भारतात व दिल्ली प्रवास करणे शक्य झाले आहे. मात्र माणगाव रेल्वे स्थाकात राजधानी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मंगला एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस, कोकणकन्या एक्सप्रेस, मारूसागर एक्सप्रेस, कोचीवली निजामुद्दिन एक्सप्रेस, मत्सगंधा एक्सप्रेस, गरीबरथ एक्सप्रेस, एल.टी.टी. धुरांत एक्सप्रेस व नव्याने सुरु झालेली मडगाव-नागपूर एक्सप्रेस लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना थांबा नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

माणगाव रेल्वे स्थानकात एक्सप्रेस लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी आपण माजी केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना तसेच कोकण रेल्वे कॉर्पोरेशन महाप्रबंधक यांची भेट घेऊन प्रवासी संघटनेच्या वतीने निवेदने दिली होती. एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळाल्यास पर्यटनाला चालना मिळून विकास होईल.

पंकज तांबे
जिल्हाउपाध्यक्ष राष्ट्रीय काँग्रेस

रेल्वे प्रवासी संघटनेने यापूर्वी अनेक वेळा कोकण रेल्वे कॉर्पोरेशन प्रबंधक निदेशक, यांना निवेदने दिली आहेत. मात्र या मागणीचा विचार रेल्वे प्रशासनाने केलेला नाही. नजीकच्या काळात प्रवासी, व्यापारी, नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.

रमेश जैन
माणगाव तालुका रेल्वे प्रवासी संघटना
Exit mobile version