| हमरापूर | प्रतिनिधी |
पीओपी गणेशमूर्तीवरील बंदी उठवल्याने हमरापूर भागातील गणेश मूर्तीकारांनी पाली येथे जाऊन बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आपला बोललेला नवस पूर्ण केला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने पीओपी गणेशमूर्तीमुळे प्रदूषण होते असे सांगत पीओपीच्या गणेशमूर्तीवर बंदी घातली होती. यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल होता.
दोन महिन्यांपूर्वी हमरापूर विभागातील गणेशमूर्तीकारांनी पाली येथे पायी पदयात्रा काढून बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले व पीओपीवरील आलेले संकट दूर होऊ दे, अशी प्रार्थना बल्लाळेश्वर चरणी केली होती. तर हमरापूर विभाग श्री गणेश उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष जयेश पाटील, सचिव राजन पाटील, पेणचे मूर्तिकार मयुरेश चाचड व इतरांनी पीओपी गणेशमूर्ती बंदी कामस्वरूपी उठली तर पुन्हा तुमच्या दर्शनाला येऊ, असे साकडे बल्लाळेश्वर विघ्नहर्ता गणपती बाप्पाला घातले होते. त्यानुसार सोमवारी न्यायालयाने पीओपी गणेशमूर्ती बनविण्यावरील बंदी उठवल्याने मंगळवारी अध्यक्ष जयेश पाटील, राजन पाटील व मयूरेश चाचड यांनी पाली येथे जाऊन बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आपले बोललेला नवस पूर्ण केला.