। पुणे । प्रतिनिधी ।
राष्ट्रवादी, काँग्रेस आणि डावे पक्ष असोत किंवा इतर पक्ष, सर्वांनी एकत्र येऊन दिल्लीत सुसंवाद निर्माण करायला हवा. कोणी आले किंवा गेले तरी फरक पडत नाही. आपण एकसंघ राहिलो तर सत्ता मिळते, हा अनुभव आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापन दिन मंगहवारी साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या मेळाव्यात बोलताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. ते म्हणाले, ऑपरेशन सिंदूरमध्ये दोन महिलांनी जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. मुलींना सैन्यात संधी मिळताच त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने चांगले काम केले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 50 टक्के तिकिटे महिलांना देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. संधी मिळाल्यास महिला आपले कर्तृत्व दाखवतात, हे वारंवार सिद्ध झाले आहे.
पवार पुढे म्हणाले की, एक काळ असा होता की पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि भारत हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा देश म्हणून ओळखला जात होता. आज आपले पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश यांच्याशी संबंध चांगले नाहीत. बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी भारताने मोठा त्याग केला, पण तो बांगलादेशही आज आपल्यासोबत नाही. देशाचे नेतृत्व करणाऱ्यांनी सुसंवादाची परिस्थिती जाणीवपूर्वक निर्माण केलेली नाही. त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे.
एका पक्षाने सत्ता मिळविण्याचे दिवस गेलेः अजित पावार
आज राजकारणाची अशी परिस्थिती निर्माण झाली की एका पक्षाची सत्ता येण्याचे दिवस संपले आहेत. कारण, केंद्रातदेखील कुणाला यूपीए किंवा कोणाला एनडीए अशी आघाडी आणि युती करावी लागल्याची परिस्थिती देशाने पाहिली आहे, असे उदगार राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी काढले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजित पवार) 26 वा वर्धापन दिन पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, मला आजही 10 जून 1999 हा दिवस आठवतो. शरद पवार आणि इतर काही मान्यवरांनी एकत्र येत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत पक्षाने कधीही मागे वळून पाहिलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा पक्ष आहे. आता काही जण मला विचारतात की तुम्ही भाजपाबरोबर का गेला आहात? मी तुम्हाला सांगतो की, 2019 साली आपल्या पक्षाने शिवसेना पक्षाबरोबर सरकार स्थापन केलं होतं. तेव्हादेखील आपण सत्तेसाठी काही तडजोडी केल्या होत्या. कारण, शेवटी विरोधी पक्षात बसून आणि घोषणा देऊन चालत नाही. आपण साधू संत नाहीत. आपण लोकांचे प्रश्न सोडवणारे आणि बेरजेचं राजकारण करणारे लोक आहोत. त्यामधून आपण भाजपा आणि एनडीएबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, असं अजित पवार यांनी म्हटले आहे.