नेरळ फटकातील वाहतूक कोंडीवर उपाययोजनेची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
मध्य रेल्वेचे मुंबई पुणे मेन लाईनवरील नेरळ उपनगरीय रेल्वे स्थानक आहे. या स्थानकाच्या पुढे असलेल्या रेल्वे फाटक हे वाहनांसाठी जीवघेणा ठरत आहे. त्या फटकातील वाहतूक कोंडी नेरळ गावासाठी नित्याची बनली आहे. दरम्यान, मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदारांनी नेरळ फाटक येथे बनलेली वाहतूक समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक प्रवाशांनी केली आहे.
नेरळ येथे मध्य रेल्वे वर 85 किमीवर फाटक क्रमांक 17 असून, त्या फाटकातून ये-जा करणाऱ्या वाहनांना हे रेल्वे फाटक त्रासदायक बनले आहे. मध्य रेल्वेवरील वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे फाटक वाहनांना ये-जा करण्यासाठी उघडल्यानंतर काही मिनिटेदेखील मिळत नाही आणि रेल्वे मार्गावर लांब पल्ल्याची गाडी किंवा मालवाहतूक गाडी किंवा लोकल ट्रेन येत असते. परिणामी, फाटक ओलांडण्यासाठी थांबून राहिलेल्या सर्व गाड्यांना फाटक ओलांडता येत नाही आणि अनेक गाड्या अडकून पडतात. नेरळ फाटक येथे दररोज वाहतूक कोंडी नित्याची बनली असून, स्थानिक रहिवासी वाहनांच्या कर्कश हॉर्नच्या आवाजाने त्रस्त झाले आहेत. तर, वाहनांचे चालक हे गाडी काही मिनिटे थांबूनदेखील फाटक ओलांडू शकत नसल्याने आपल्या गाड्यांसह अडकून राहात आहेत.
नेरळ फटकातील ही वाहतूक कोंडी सर्वांसाठी त्रासदायक ठरत असून, ते फाटक वाहने जाण्यासाठी चालू-बंद करणारे रेल्वे कामगार हे स्थानिक नसल्याने दररोज वाहनचालकांची भांडणे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यात वाहने रुळ ओलांडत असताना फाटक बंद करण्याची घाई येथील कर्मचारी करीत असल्याने वाहनांचे दुसऱ्या वाहनांना धडकून होणारे अपघात वाढले आहेत. मध्य रेल्वे प्रशासनाने नेरळ फाटक येथील वाहनांची वाहतूक कोंडी लक्षात घेऊन उड्डाणपूल बांधण्याच्या कामाचा विचार करावा, अशी मागणी त्या भागातील रहिवासी निवृत्त बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सूर्यकांत चंचे यांनी केली आहे.
आम्हाला नेरळ फाटकातून आमची दुचाकी पलीकडे न्यायला दहा-पंधरा मिनिटे लागतात. ज्यावेळी फाटक बंद होते, त्यावेळी तर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा एवढ्या लांबपर्यंत लागतात की वाहन चालकांच्या गाड्यांचे हॉर्न यामुळे परिसरात चिवचिवाट सुरू असतो.त्यात सर्व वाहने गेल्यानंतर फाटक बंद करण्यात येत नसल्याने अनेक वाहन चालकांच्या डोक्यात आणि चारचाकी वाहनांवर फाटक बंद राहण्याची घाई करताना पाडले जाते. हे चुकीचे असून, मध्य रेल्वे आणि मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदारांनी यावर समाधानकारक उपाययोजना कराव्यात.
ओंकार तरे,
स्थानिक वाहनचालक