वर्षभरात दोन लाख प्रवाशांनी घेतला लाभ
| माथेरान | प्रतिनिधी |
एक तपाहून अधिक काळ कडवट संघर्ष झेलत आणि खडतर आव्हाने पेलून अशक्य ते शक्य करण्याची खरी धमक आणि जिद्दीने यशाचे शिखर गाठण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा हेच खरे हातरिक्षा संघटनेच्या सदस्यांचे द्योतक असून, खऱ्या अर्थाने स्वतःच्या खिशाची पदरमोड करून हातरिक्षा चालकांना अमानवीय प्रथेतून बाहेर काढण्यासाठी निवृत्त प्राध्यापक सुनील शिंदे यांनी दिलेल्या लढ्यामुळेच एकूण 94 पैकी वीस हातरिक्षा मालकांना सद्यःस्थितीत 10 जून 2024 रोजी हक्काची ई-रिक्षा प्राप्त झाली. आजच्या घडीला ई-रिक्षा एक वर्षाची झाली आहे.
ई-रिक्षा मालकांच्या ताब्यात आल्यापासून अत्यंत प्रामाणिकपणे प्रवाशांना सेवा उपलब्ध करून देत आहेत. सर्वांशी आपुलकीने आणि आदराने वेळेत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. एकूण 94 पैकी वीस जणांना ई-रिक्षाचा लाभ मिळाला असला तरीसुद्धा उर्वरित 74 ई-रिक्षा लवकरच सुरू होणे आवश्यक आहे. हातरिक्षा ओढण्याची ही अमानवीय प्रथा पूर्णपणे अद्यापही संपुष्टात आलेली नसून आजही अनेकजण हातरीक्षा ओढून आपल्या कुटुंबाला आधार देत आहेत. ज्यावेळी उर्वरित सर्वच ई-रिक्षा सुरू होतील तो दिवस हातरिक्षा चालक मालकवर्गासाठी आणि इथल्या पर्यटनाला चालना देणारा सुवर्णक्षण, ऐतिहासिक दिवस असेल आणि त्याच दिवसाची वाट अन्य हातरिक्षा चालक-मालकवर्ग चातकाप्रमाणे प्रतीक्षेत आहेत. सद्यःस्थितीत वीस ई-रिक्षांपैकी पंधरा रिक्षा शालेय विद्यार्थ्यांची ने-आण करीत आहेत आणि पाच ई-रिक्षा प्रवाशांना सेवा देण्यासाठी खूपच कमी पडतात. त्यासाठी राज्य शासनाच्या कार्यक्षम मंत्री महोदयांनी पर्यटन क्रांती घडवून आणण्यासाठी दुर्गम माथेरानकडे आपले लक्ष केंद्रित करून ह्या स्थळाला जगाच्या नकाशावर अग्रस्थानी आणावे, अशी अपेक्षा श्रमिक वर्ग व्यक्त करीत आहेत.
वर्षभरात दोन लाख प्रवाशांनी घेतला लाभ
10 जून 2024 ते 10 जून 2025 या कालावधीत एकूण 2 लाख प्रवाशांनी ई रिक्षाचा लाभ घेतला आहे. 350 शालेय विद्यार्थ्यांना नियमितपणे सेवा दिली जाते. एका वर्षात एकूण 592 रुग्णांना हॉस्पिटलची सेवा उपलब्ध करून दिली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांची पायपीट थांबली आहे. आपत्कालीन चोवीस तास सेवा उपलब्ध आहे.
ई-रिक्षाने माथेरानच्या पर्यटनात क्रांती केली आहे स्थानिक व पर्यटकांना हक्काची व परवडणारी वाहतूक सुरू झाली आहे, तसेच हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती होऊ शकली आहे. मात्र, फक्त वीस चालकांना ई-रिक्षाची परवानगी दिली आहे. अद्याप 74 चालक प्रतीक्षेत आहेत. हातरिक्षा परवाना हाच निकष धरून परवानगी दिली तरच ही अमानवीय प्रथा बंद होईल.
सुनील शिंदे,
याचिकाकर्ते