अधिकारी गलेलठ्ठ, उरणकर जलमय
| उरण | प्रतिनिधी |
शनिवार दुपारी अवघ्या 15-20 मिनिटांच्या मुसळधार पावसाने उरण शहराची ‘त्रेधावस्था’ केली. रस्ते, गल्लीबोळ, दुकाने सगळं जलमय झालं आणि उरण नगरपालिकेच्या नालेसफाईच्या खोट्या दाव्यांची चिखलफेक समोर आली.
7 जून रोजी दुपारी 1 ते 2 दरम्यान मुसळधार पाऊस पडताच शहरातील रस्ते गुडघाभर पाण्याखाली गेले. मोटारसायकल तरंगू लागल्या, दुकानांत पाणी घुसलं आणि जनतेमध्ये भीतीचे वातावरण पसरलं. जर हा पाऊस थोडा वेळ अधिक चालला असता, तर उरणमध्ये थेट पूरस्थिती निर्माण झाली असती, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. अजून खऱ्या पावसाला सुरुवात झाली नाही.
नालेसफाई न करता बिले पास हेच गणित उरण नगरपालिकेपासून ते ग्रामपंचायतीपर्यंत पाहायला मिळतं, असा आरोप उरणकर करीत आहेत. दरवर्षी नालेसफाईसाठी लाखो रुपये मंजूर होतात, पण प्रत्यक्षात नाल्यांमध्ये कचऱ्याचा पहाड दिसतो. नगरपालिका आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे पावसात उरणकरांचे घर, दुकान, वाहने सगळं बुडतंय आणि लोकांचे कराचे पैसे कुठे जातात हे कळायलाच मार्ग नाही, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. नालेसफाईवर लाखो रुपये खर्च दाखवले जातात, पण काम शून्य, अशी परिस्थिती असल्याचे उरणकरांचे म्हणणे आहे. याप्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पावसाच्या एका झटक्यात उरण पालिकेच्या भ्रष्टाचारी कारभाराचा ‘फज्जा’ उडाला आहे, अशी टीका नागरिकांकडून करण्यात येत आहे.