नवी मुंबई शहरावर राहणार सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर

। नवी मुंबई । प्रतिनिधी ।

नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या व नवी मुंबई शहरावर 1500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर राहणार आहे. या कामासाठी देण्यात आलेली 21 नोव्हेंबर या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने शहरातील लिडारनंतर या कामालाही मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता नवी मुंबई शहरावर 1500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचा वॉच राहणार असून त्यासाठी नवी मुंबईकरांना 24 फेब्रुवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

तत्कालीन आयुक्त अभिजीत बाांगर यांच्या काळात सुरु झालेल्या अनेक कामापैकी लिडार सर्वेक्षण व शहरावर 1500 सीसीटीव्ही कॅमेर्‍यांची नजर या दोन्ही कामांना पालिकेने मुदतवाढ दिलेली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरावर तिसर्‍या डोळ्याची नजर राहणार आहे. मेसर्स टाटा अँडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांच्याकडून शहरात प्रत्यक्ष काम करण्यात येत असून पुढील काही महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील 282 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतू शहरातील सर्वच विभागात1500 महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महापालिका जवळजवळ 150 कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पध्दतीने शहर तिसर्‍या डोळ्याच्या नजरेत आणणार असून त्यासाठीची सुरवात झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका व्याप्त हद्दीतील महत्वाची निवडक ठिकाणे, नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारे, मुख्य चौक, मार्केट, बस डेपो, रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी शहरातील मुख्य रस्ते याठिकाणी पालिकेने 2012 रोजी 282 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतू आयटी उपकरणे यांचे आयुर्मान 5 वर्ष निश्‍चित करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात 1500 अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.

Exit mobile version