| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीवर अतिरिक्त दोन मजल्याचे बांधकाम व विद्युतीकरण कामांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय महाविद्यालय सन 2021-22 वर्षापासून सुरु झाले आहे.
सद्य:स्थितीत महाविद्यालयाच्या सन 2023-24 च्या तृतीय वर्षाच्या 100 विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरु असून जिल्हा रुग्णालय, अलिबाग हे महाविद्यालयाशी संलग्नित करण्यात आले आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान परिषद, नवी दिल्ली यांच्या मानकांची पूर्तता तसेच शैक्षणिक हितास्तव जिल्हा रुग्णालय, अलिबाग, येथील शल्यचिकित्सा कार्यालय व वेअर हाऊस या इमारतीवर अतिरिक्त दोन मजल्याचे बांधकाम व विद्युतीकरण करणे या कामांना आवश्यक रुपये 6 कोटी 36 लाख 25 हजार 223 इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या दि.6 सप्टेंबर 2023 च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे.
कामाचा दर्जा, कालावधी आणि जनतेला या सर्व योजनांचा लाभ लवकरात लवकर मिळावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या होत्या.
वसतिगृहातील आवश्यक फर्निचर खरेदी करण्यास मान्यता
अलिबाग येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या एम.बी.बी.एस.च्या विद्यार्थ्यांच्या आवश्यक सुविधांकडे लक्ष पुरविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. या संस्थेतील विद्यार्थी वसतीगृहातील आवश्यक फर्निचर खरेदी करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, नवी दिल्ली यांच्या मानकानुसार व राज्य योजनांतर्गत मंजूर अनुदानातून एकूण 73 लाख 31 हजार 500 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला आहे. नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवास सुविधांसाठी या निधीचा फायदा होणार आहे.