बळीराजाची खरीप हंगामासाठी तयारी

| पनवेल | प्रतिनिधी |

सध्या वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले असून, आता सर्वांचे लक्ष पावसाच्या आगमनाकडे लागले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील बळीराजा येणाऱ्या खरीप हंगामासाठी तयारीला लागल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल तालुक्यासह रायगड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पेरणीपूर्व नियोजन करत आहेत. बाजारपेठांमध्ये तसेच बी-बियाणे विक्री केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. विविध प्रकारचे दर्जेदार बी-बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुकानदारांकडे चौकशी करताना दिसत आहेत. यंदा वेळेत पाऊस पडून चांगले उत्पादन मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. भात, नाचणी, बाजरी तसेच विविध भाजीपाला पिकांच्या बियाण्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांतील बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता असली, तरी यावर्षी निसर्ग साथ देईल आणि भरघोस पीक येईल, असा आशावाद शेतकरी राजामध्ये दिसून येत आहे.

Exit mobile version