मतदारांमध्ये उदासिनता
। पोलादपूर । वार्ताहर ।
नगरपंचायत पोलादपूरच्या दुसर्या टप्प्यातील उर्वरित चार प्रभागांतील निवडणुकीदरम्यान तिरंगी लढतीत भाजप, शिवसेना व काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी चार अशा एकूण 16 उमेदवारांचे भवितव्य मंगळवारी सकाळपासून हळूहळू इव्हिएम मतदान यंत्रामध्ये बंद होऊ लागले आहे. कोविड-19च्या नियमावलीचे सर्वच मतदान केंद्रांमध्ये पालन केले जात होते.
प्रभाग 2 मध्ये शिवसेनेचे मनोज प्रजापती, काँग्रेसचे कल्पेश मोहिते व भाजपाचे संभाजी माने मतदारांची रांग मोठी दिसून आली तरीही मतदारांचा उत्साह तुलनेत कमी दिसून आला. 380 मतदार असलेल्या या प्रभागातील मतदान करण्यास गेलेल्यांच्या चेहर्यावर निरूत्साह दिसून येत होता. या ठिकाणी सकाळी साडेसात वाजल्यापासून रयतच्या विद्यामंदिरामध्ये 140 मतदान झाल्याचे दुपारी दीड वाजता सांगण्यात आले.
प्रभाग 8 मध्ये शिवसेनेच्या सोनाली गायकवाड विरूध्द काँग्रेसच्या अनिता जांभळेकर या लढतीमध्ये भाजपच्या रचना धुमाळ या तिरंगी लढतीदरम्यान शंकरराव महाडीक न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 348 मतदारांपैकी 174 मतदारांनी हक्क बजावला. प्रभाग 10 मध्ये शिवसेनेचे प्रसाद इंगवले विरूध्द काँग्रेसच्या शुभांगी चव्हाण तर भाजपचे प्रतिक सुर्वे यांच्या लढतीमध्ये मतदान प्राथमिक शाळा नं.1 मध्ये मतदान तुरळक सुरू होते. दुपारी दीड वाजेपर्यंत 100 मतदारांनी हक्क बजावला होता एकूण मतदान 287 आहे. प्रभाग 14 मध्येदेखील शिवसेनेच्या प्राची सुतार विरूध्द काँग्रेसच्या प्रतिक्षा भूतकर या लढतीमध्ये भाजपच्या अंकिता जांभळेकर यांनी केलेल्या निकराच्या प्रचारानंतरही मतदारांचा प्रतिसाद हळूहळू दिसून येत असून मतदारांमध्ये उदासिनता दिसून आली तरी शेवटच्या तासाभरात मतदानाची टक्केवारी सर्वत्र 70-80 टक्क्यांदरम्यान राहिल असे चित्र जाणवत आहे. केवळ 136 मतदार असलेल्या या प्रभागाचे मतदान प्राथमिक शाळा नं.1 मध्ये मंदगतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे.