माणगाव पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करुन बाहेर काढण्यासाठी माणगाव पोलीस ठाण्यातील महिला पोलिस नाईक कुंजन जाधव यांना 90 हजार रुपयांची लाच मागितल्याने गुन्हा दाखल करुन रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
याबाबतची माहिती अशी की, तक्रारदार यांच्याविरुद्ध माणगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल होता. या चोरीच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी महिला पोलिस नाईक कुंजन जाधव यांना मदत करण्यास सांगितले. त्यांनी गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी मदत करण्यासाठी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती 90 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. याबाबत तक्रारदाराने रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.
लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केल्याने कुंजन जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन जाधव यांना ताब्यात घेण्यात आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकात पोलिस उपअधिक्षक सुषमा सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अरुण करकरे, विनोद जाधव, महेश पाटील, पोलिस नाईक जितेंद्र पाटील, सचिन आटपाडकर यांचा समावेश होता.