रोहयो मंत्री भरत गोगावले यांची पुन्हा संधी हुकली
। रायगड । खास प्रतिनिधी ।
जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? हा तिढा सुटलेला नाही. माजी पालकमंत्री तथा महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्तेच 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांची संधी पुन्हा एकदा हुकल्याचे बोलले जाते.
रायगडच्या पालकमंत्रीपदावरुन महायुतीमधील वादळ अद्याप घोंगावत आहे. मुख्यमंत्र्यांनी दावोस दौर्यावर जाण्याआधी विविध जिल्ह्यांतील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये प्रामुख्याने रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदावरुन वाद उफाळून आला होता. रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि नाशिक जिल्ह्यासाठी भाजपाचे गिरीश महाजन यांची निवड पालकमंत्री म्हणून करण्यात आली होती. त्यानंतर याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या मंत्र्यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सरकारने 48 तासांतच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसवरुन परत आल्यावर पालकमंत्रीपदाची घोषणा करणार, असे बोलले जात होत. त्याच दरम्यान आता 26 जानेवारी या प्रजासत्ताकदिनी मुख्य सरकारी ध्वजारोहणाचा मान मंत्री आदिती तटकरे यांना मिळाला आहे. याबाबतची सरकारी निमंत्रण पत्रिका जिल्हाधिकारी यांनी काढली आहे.