| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे उभी राहिली आहेत. त्यावर कारवाई होत नसल्याने ही अतिक्रमणे दिवसेंदिवस वाढत चालली आहेत. हे टाळण्यासाठी उरण वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी उरण तालुक्यातील वन विभागाची जागा निश्चित करणे आवश्यक बनले आहे.
काही दिवसांपूर्वी उरण वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात वन विभागाची वहाळ गावातील परवानगी न घेता जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण करून जमिनीची कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून हडप केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे. परंतु वन विभागाची जागा तालुक्यात कुठेकुठे आहे, याची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचे दिसते. उरण तालुक्यातील वन विभागाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेली आहेत आणि होताना दिसत आहेत. काहींनी तर आलिशान बंगले उभे केले आहेत. तर काहींनी डोंगर पोखरून माती चोरून नेली आहे. याकडे उरण वन विभागाचे लक्ष नसल्याबद्दल जनतेत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
उरण तालुक्यातील वन विभागाच्या जागेवरील वाढती अतिक्रमणे मोडीत काढण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक बनले आहे. उरण वनपरिक्षेत्र अधिकारी नथुराम कोकरे यांनी तालुक्यातील वन विभागाच्या जागेची मोजणी करून कंपाऊंड घालावीत, त्यावेळी वन विभागाच्या जागेमध्ये असणार्या अतिक्रमणांवर कारवाई करून ती जमीनदोस्त करण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.