शिवकालीन खेळ असल्याचे तज्ज्ञांचे मत
| रायगड | सुयोग आंग्रे |
बैठ्या खेळांच्या शोधमोहिमेत खांदेरी किल्ल्याच्या तटबंदीवर ‘मंकला’ आणि ‘वाघबकरी’ या खेळांचे कोरीव अवशेष मिळाले आहेत. खांदेरीच्या तटबंदीवर अशा प्रकारचे दोन खेळ सापडल्याची माहिती बैठ्या खेळाचे अभ्यासक पंकज भोसले यांनी दिली. असून, त्यातील एक खेळ अंशतः नष्ट झाला आहे. त्यावरील रेखीव अवशेष अस्पष्ट स्वरूपात दिसत आहेत. एके ठिकाणी ढासळलेल्या तटबंदीवर हा खेळ असून, तो मोठ्या दगडावर कोरलेला आहे. ‘आर्ट ऑफ प्लेईंग’ आणि ‘आपला कट्टा’ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही शोधमोहीम मे महिन्यात घेण्यात आली होती, असेही भोसले यांनी सांगितले.
मुंबईचे इंग्रज आणि जंजिरेकर सिद्धी यांच्यापासून समुद्र सीमांचे रक्षण करण्यासाठी शिवरायांनी इ.स.1672 मध्ये मुंबईपासून 15 मैलावर असणाऱ्या ‘खांदेरी’ बेटावर किल्ला बांधण्याचे ठरविले. इ.स 1679 मधे मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली निवडक 150 माणसे देऊन ऐन पावसाळ्यात खांदेरी जलदुर्गाच्या बांधकामास पुन्हा सुरुवात करण्यात आली. अभेद्य मजबूत तटबंदी व बुलंद बुरुज असलेला हा खांदेरी किल्ला समुद्राच्या लाटांना समर्थपणे तोंड देत दिमाखाने आजही उभा आहे.
भारतात या खेळाचे अस्तित्व केव्हापासून आहे, याचा संदर्भ सापडत नाही. पण वेगवेगळ्या राज्यात या खेळाला वेगवेगळी नावे आहेत. अलीगुली माने, चिने माने, हरलु माने, पिचकी माने, गोटू गुणी, पलंगुजी ही दक्षिण भारतातील काही नावे. सातगोल, सातगोटी, गोगलगाय, गायव्याली ही काही मराठी-हिंदी नावे. गुरुपल्यान हे या खेळाचे कोंकणी नाव आहे. भारतामधील बऱ्याच लेण्यांमध्ये हा खेळ पाहायला मिळतो. महाराष्ट्रातील कार्ले, भाजे, बेडसे, आगाशीव, गडद लेणी ह्या सर्व ठिकाणी हा खेळ कोरलेला आहे. दुर्गदुर्गेश्वर रायगड येथे जवळ जवळ पाच ठिकाणी विविध घरट्यांच्या ओसरीवर हा खेळ पाहायला मिळतो. मंकला हा खेळ जगभरात सर्वत्र खेळला जातो. विशेष करून आफ्रिकेत हा खेळ खूप प्रचलित आहे. ‘बाव’ म्हणून ओळखला जाणारा हा खेळ तेथील ‘स्वाहिली’ ह्या जमातीचा पारंपरिक खेळ आहे. पुरातन इजिप्तमधील लुकसोर, कार्णाक या वास्तूंमध्ये या खेळाचे अवशेष उत्खननात सापडलेले आहेत. कालांतराने त्याचा प्रसार आफ्रिकेपासून मध्य आशिया, दक्षिण आशिया खंडात झाला. बाराव्या शतकापर्यंत या खेळाचे सुमारे 200 प्रकार अस्तित्वात होते, असे काही संदर्भ मिळतात.
खांदेरी किल्ल्यावर सापडलेले हे पट त्या खेळांचा कालखंड सिद्ध करतो. 17व्या शतकात बांधलेला हा किल्ला शिवरायांच्या सामुद्रिक सामर्थ्याचे प्रतिक आहे. इथे असलेले शिबंदीतील सैन्य या खेळाच्या माध्यमातून आपले मनोरंजन करीत असावेत. नियोजन कौशल्य, एकाग्रता, गणिती ज्ञान तसेच अध्यात्मिक कौशल्य यांनी परिपूर्ण असलेले हे भारतीय बैठे खेळ , या कोरीव स्वरुपात आजही टिकून आहेत. गडसंवर्धन करतना या खेळांकडेही बारकाईने लक्ष देणे फार गरजेचे आहे. कोरीव अवशेष असलेला एखादा दगड जर पालथा पडला, तर त्या खेळाचे अस्तित्व कायमचे संपुष्टात येईल.
गणिती कौशल्य वाढवणारा ‘मंकला'
जमिनीवर समांतर रेषेमध्ये समोरासमोर सात किंवा आठ किंवा त्याहूनही अधिक खड्डे पाहायला मिळतात. या खेळाचे नाव ‘मंकला' आहे. गणिताचे कौशल्य वाढवणारा हा खेळ जगभर विविध नावाने प्रसिद्ध आहे. खांदेरी किल्ल्यावर या खेळाचे एकूण दहा पट या शोधमोहिमेत सापडले आहेत. इथे सापडलेल्या एका मंकला पटाचे वैशिष्ट्य असे की, इथे समोरासमोर सात किंवा आठ खड्ड्यांऐवजी एकूण 27 खड्डे (एकाच पटात) दिसून आले आहेत. खेळाचे हे नवे स्वरूप आफ्रिकेमधील ‘बाओ' या खेळाशी मिळते जुळते आहे.
वाघबकरी शिकारीचा खेळ
खांदेरी येथे सापडलेला दुसरा खेळ, शिकारीचा खेळ म्हणून ओळखला जाणारा ‘वाघबकरी' हा खेळ आहे. छोट्या पटापासून ते अगदी मोठ्या पटापर्यंत हा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. एका विशिष्ट प्रकारची रचना असलेल्या या खेळाचे महाराष्ट्रात जवळजवळ 4 ते 5 वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात. वाघाने जास्तीत जास्त बकरीची शिकार करायची आणि बकरीने बचाव करून वाघास कोंडीत पकडायचे, असे नियोजन कौशल्य वाढवणारा हा खेळ आहे.
जलदुर्गावरील पहिलाच खेळ
सरेखन पद्धती वापरून शिकारीचा खेळ म्हणून प्रसिद्ध असलेला हा खेळ महाराष्ट्रातील समुद्री किल्ल्यावर (जलदुर्गावर) सापडलेला हा पहिलाच खेळ आहे. दक्षिण भारतात या खेळला हुलीकलु, अडूहुली, पुलीमेका अशी नावे आहेत. बंगालमध्ये या खेळास बाघबोक, तर उत्तर भारतात काही ठिकाणी धूनकासादेखील म्हणतात. गुजरातमध्ये हा खेळ वाघ बकरी या नावाने ओळखला जातो.
खेळांचे अस्तितव धोक्यात
अजूनही गडदुर्गावर अस्तित्व टिकवून असलेले हे ऐतिहासिक बैठे खेळ आता लुप्त होण्याच्या मार्गांवर आहेत. वातावरणातील बदल, ऐतिहासिक वारसा जपण्याच्या चुकीच्या पद्धती, संवर्धनाचा अभाव, गडदुर्गांवरील अस्वच्छता, त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाविषयीचे अज्ञान यामुळे या बैठ्या खेळांचे अस्तित्व सध्या धोक्यात आले आहे. संदर्भासहित अभ्यास करून एकाग्रता, संभाव्यता, धोरणात्मक नियोजन, संयम यासारख्या मूलभूत तवावर आधारित असलेले , हे खेळ नवीन पिढीपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
मे महिन्यात शोधमोहीम
आर्ट ऑफ प्लेईंग आणि आपला कट्टा या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ही शोधमोहीम मे महिन्यात घेण्यात आली होती. यात बैठ्या खेळांचे अभ्यासक पंकज भोसले, ममता भोसले, केतकी पाटील, सिद्धेश गुरव आणि अनिकेत पाटील यांनी सहभाग घेतला होता.