नळजोडणी तोडली
। पनवेल । वार्ताहर ।
जनतेला प्यायला पाणी नाही, तर उद्यानांना कुठून पाणी देणार? या विचित्र नियमावलीनुसार कळंबोलीतील उद्यानांची पाणी जोडणी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे कळंबोलीतील उद्यानांतील झाडे पूर्णतः सुकू लागली आहेत.
जमिनीला मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत. एकीकडे पाण्यासाठी उपाययोजना करता येत नसतानाही मात्र अन्य कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचा खटाटोप सिडको प्रशासनाकडून करण्यात येत असल्याचे मात्र दिसून येत आहे. याबाबत सिडकोचे कळंबोलीतील अधिकारी गाडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उद्यानातील नळजोडणी बंद करण्यात आली असून, आता बोरअवेलची व्यवस्था करून झाडांना पाणीपुरवठा पूर्ववत केला जाणार असल्याचे सांगितले.
कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 6 मध्ये मोठे उद्यान आहे. उद्यानात गेले पाच ते सहा दिवसांपासून झाडांना पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे उद्यानातील झाडे सुकू लागली आहेत. जमिनीला भेगा पडू लागल्या आहेत. या उद्यानांमध्ये माळी काम करणारा माणूस तर दिसून येत नाही. उद्यानामध्ये जी व्यवस्था पाहिजे, ती पूर्णपणे देण्यात आलेली दिसून येत नाही.
याबाबत सिडको विभागातील गाडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की सिडकोच्या वरिष्ठ पातळीवरूनच उद्यानातील पाणीपुरवठा बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांनाच प्यायला पाणी अपुरे असल्याने झाडांना पाणी कसे देणार, असा प्रश्न उपस्थित केला आहे. यापुढे बोअरवेल खणून झाडांना पाणीपुरवठा पूर्ववत केला जाईल, असे सांगण्यात आले.
उद्यानातील खेळणी ही तुटलेल्या अवस्थेत पडून आहेत. कचर्याचे ढीग पुन्हा रचू लागल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षा रक्षक व माळी काम करणारा कोणीही दिसून येत नाही. त्यामुळे उद्यानाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथे विजेचे दिवेही पूर्णावस्थेत सुरू नसल्याने रात्रीच्या वेळी गर्दुल्ले व मद्यपी येथे ठाण मांडून बसलेले असतात. याकरिता उद्यानात कायमस्वरूपी माळी काम करणारा व सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी जोर धरू लागली आहे.