वाळूची चढ्या दराने विक्री
। पनवेल। वार्ताहर ।
वाळू उत्खननावर न्यायालयाच्या आदेशानंतर शासनाने बंदी घातली आहे. पनवेल, नवी मुंबई परिसराला मोठा खाडी किनारा लाभला आहे. पनवेल परिसरात उलवा, खारघर खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात बंदी डावलून अनधिकृत वाळूउपसा केला जातो. महसूल विभागामार्फत या अनधिकृत व्यवसाय करणार्या वाळूमाफियांवर वेळोवेळी कारवाई देखील केली जाते. मात्र, तरीसुद्धा वाळूमाफिया विविध शक्कल लढवून हा अनधिकृत व्यवसाय करीत आहेत.
सध्या वाळूउपसा बंद केला तरीही अनधिकृत घाटाचा ताबा मात्र कायमच आहे.अनधिकृत रेतीउपसा करणारे थेट सक्शन पंप लावून अशाप्रकारे रेती उपसा करीत असतात.
उलवा, कोपरा खाडीत आजतागायत महसूल विभागामार्फत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या गेल्या आहेत. जवळपास 50 पेक्षा जास्त वेळा या कारवाया करून महसूल विभागाने सक्शन पंप आदींसह विविध साहित्य नष्ट देखील केले आहे. तहसीलदार विजय तळेकर यांनी याकरिता वेळोवेळी पुढाकार घेतला आहे.
कारवाईत पोलीस प्रशासनाची टाळाटाळ
अनधिकृत वाळूउपशाची शेकडो प्रकरणे पनवेल तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत. या कारवाईत त्याठिकाणी कार्यरत असलेल्या मजुरांवर कारवाई केली जाते.खरे वाळूमाफिया या कारवाईत मोकाट सुटत असल्याने माफियांवर पोलिसांचा तर वरदहस्त नाही ना? असाही प्रश्न अनेक वेळा उपस्थित होतो.
वाळूची प्रतिब्रास साडेचार ते पाच हजारांनी विक्री
कोणतीही शासकीय परवानगी न घेता अनधिकृत उत्खननाद्वारे या रेतीची प्रतिब्रास साडेचार ते पाच हजार प्रति ब्रासने विक्री करून वाळूमाफिया गब्बर बनत चालले आहेत.
पारंपरिक व्यवसायावर मात्र गदा
स्थानिक आगरी कोळी बांधव पारंपरिक पद्धतीने वाळूचा उपसा करून आपला उदरनिर्वाह करीत आले आहेत. मात्र, उत्खननावर बंदी आल्यानंतर मोठ्या होडीच्या सहाय्याने पाण्यामध्ये डुबकी मारून रेती उत्खनन करणार्या व्यावसायिकांवर निर्बंध आले आहेत.