पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपुरक मुर्ती साकारण्यावर भर
| रायगड | प्रमोद जाधव |
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मुरूड तालुक्यातील खार आंबोलीतील मुर्तीकार प्रताप वारगे, संदीप वारगे यांनी पर्यावरणपूरक मूर्ती साकारण्यावर भर दिला आहे. शाडू मातीची मूर्ती हाताने घडविण्याची कला आजही त्यांनी वडिल नामदेव वारगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्यासोबत जिवंत ठेवली असून, ही कला जपणारी वारगे कुटुंबाची दुसरी पिढी आहे.
मुरूड तालुक्यातील खारआंबोली येथील 86 वर्षीय नामदेव वारगे यांनी सुमारे 50 वर्षांपूर्वी शाडूच्या मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात केली. या कलेचे धडे त्यांनी मुरूडमधील वसंत जंजिरकर यांच्याकडून घेतले होते. ते ग्राहकांच्या पसंतीसह मागणीनुसार शाडूच्या गणेशमुर्ती तयार करून देण्याचे काम करीत आहेत. आता ही कला नामदेव वारगे यांची दुसरी पिढी समर्थपणे त्यांच्या सोबत पुढे नेण्याचे काम करीत आहे. ते आजही प्रताप वारगे व संदिप वारगे यांच्यासोबत शाडूच्या मुर्तीला आकार देण्याचे काम करीत आहेत. तसेच, वारगे कुटूंबिय गेल्या 50 वर्षांपासून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाडूच्या मुर्ती तयार करीत आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा प्रभाव वाढत असतानाही परंपरा, कलात्मकता आणि पर्यावरण संवर्धन यांचा सुंदर संगम साधत आहेत. आधुनिकतेच्या युगातही हाताने मूर्ती घडविण्याची ही कला जिवंत ठेवणारे वारगे कुटूंबिय मुरुड तालुक्याच्या कलाविश्वातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत.
यंदाचा गणेशोत्सव दि.14 सप्टेंबर रोजी असून, शणेशोत्सव अवघ्या 54 दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे वारगे कुटुंबियांची मोठी धावपळ सुरू झालेली आहे. ते गणेशोत्सवासाठी विविध आकारांच्या शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत. दरवर्षी सुमारे 350 शाडूच्या मूर्तींची विक्री होत असून, संपूर्ण मुरुड तालुक्यातसह अलिबाग आणि तळा तालुक्यातील ग्राहकांकडून त्यांच्या मूर्तींना मोठी मागणी आहे. ते दीड फुटापासून पाच फुटांपर्यंत मुर्ती तयार करण्याचे काम करीत आहेत.
अनेकांच्या हाताला मिळते काम
मुरूड तालुक्यातील प्रसिद्ध मुर्तीकार म्हणून नामदेव वारगे, प्रताप वारगे आणि संदिप वारगे यांच्याकडे पाहिले जाते. गणेशोत्सानिमित्त गणेशमुर्ती तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. मूर्ती साकारण्यापासून त्यांना रंग लावणे, अशा अनेक कामांतून परिसरातील बेरोजगारांना रोजगाराचे साधन वारगे कुटुंबियांकडून उपलब्ध झाले आहे. त्यातून अनेकांच्या हाताला काम मिळत आहे.
मुंबईतही मुरूडचा बोलबाला
नामदेव वारगे यांचा मुलगा जयवंत वारगे हे नोकरी निमित्त मुंबईत राहतात. नोकरी सांभाळून ते मुंबईत मूर्ती साकारण्याचा व्यवसाय जपण्याचे काम करीत आहे. ते गणेशोत्सवात मुंबईकरांना शाडूच्या मूर्ती तयार करून देण्याचे काम करतात. त्यामुळे मुंबईतही मुरूडचा बोलबाला होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
