मुलींनी दिला रावत दाम्पत्याला मुखाग्नी

अमर रहेच्या नार्‍याने देश दुमदुमला
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
‘अमर रहे… अमर रहे… जनरल अमर रहे, वंदे मातरम्, भारत माता की जय, जब तक सूरज चांद रहेगा, बिपीनजी का नाम रहेगा, बिपीनजी अमर रहे. अमर रहे, अमर रहे…’च्या घोषणा देत सीडीएस जनरल बिपीन रावत यांना साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्यावरही एकाचवेळी दिल्लीच्या ब्रार स्क्वायर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या दोन मुलींनी आई-वडिलांना मुखाग्नी दिला. तामिळनाडूतील कुन्नूरमध्ये बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस बिपीन रावत यांच्यासह लष्कराच्या 11 जणांचे निधन झाले. दिल्लीच्या कामराज मार्गावरील कॅन्टोन्मेंट येथील ब्रार स्माशानतभूमीत ब्रिगेडियर लिड्डर यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच ठिकाणी संध्याकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारात सीडीएस जनरल बिपीन रावत आणि त्यांची पत्नी मधुलिका रावत यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कन्या कृतिका आणि तारिणी यांनी आपल्या मात्यापित्यांना मुखाग्नी दिला. यावेळी अनेकांना अश्रू अनावर झाले होते.

लष्कराकडून 17 तोफांची सलामी
भारतीय लष्कराने देशाच्या पहिल्या सीडीएसल अखेरचा निरोप देत 17 तोफांची सलामी दिली. त्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल, लष्करप्रमुख एम.एम. नरवणे, हवाई दल आणि नौदल प्रमुखांनी सीडीएस रावत यांना श्रद्धांजली वाहिली.

चार देशाच्या अधिकार्‍यांची मानवंदना
सीडीएस बिपीन रावत यांच्या अंत्यसंस्कारासाठी हजारो लोक जमले होते. दिल्ली आणि आसपासच्या राज्यातूनही लोक आले होते. तसेच श्रीलंका, भूतान, नेपाळ आणि बांगलादेशातील सैन्याचे कमांडरही या वीर योद्ध्याला अखेरची सलामी देण्यासाठी आले होते.

Exit mobile version