श्रीवर्धनमधील सुवर्ण गणेशाची पुन्हा प्रतिष्ठापना होणार

। मुंबई । प्रतिनिधी ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगरच्या श्री सुवर्ण गणेशाचा मुखवटा घडविणे व प्रतिष्ठापना करण्यासाठी ताबा सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द करण्यासाठी शासन स्तरावर कार्यपद्धती निश्‍चित करण्याबाबत पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या विनंतीनुसार राज्याचे गृह मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे, खा.सुनील तटकरे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, रायगड अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, श्रीवर्धनचे उपविभागीय अधिकारी अमित शेडगे व दिवे आगरचे सरपंच व सुवर्ण गणेश मंदिराचे विश्‍वस्त बाळकृष्ण बापट यावेळी उपस्थित होते. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्राप्त मुद्देमाल राज्यशासनाची मालमत्ता आहे. सद्यस्थितीत हा मुद्देमाल जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने उप कोषागार, श्रीवर्धन येथे पोलीस सुरक्षेमध्ये आहे.

या मुद्देमालापासून सुवर्ण गणेश मुखवटा घडविणे व सुवर्ण गणेश मंदिरात प्रतिष्ठापना करुन त्याचा ताबा मंदीर ट्रस्टकडे सूपूर्द करणेबाबत माहिती पालकमंत्री तटकरे यांनी दिली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुद्देमालापासून सुवर्ण गणेशाच्या आधीच्या मुखवट्याप्रमाणेच नवीन मुखवटा तयार करुन त्याची प्रतिष्ठापना करण्यात यावी. लोक भावना विचारात घेऊन सुवर्ण गणेश प्रतिष्ठापना करण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासन व दिवेआगर सुवर्ण गणेश मंदिर ट्रस्ट यांनी समन्वयाने करावी, असे निर्देश गृह मंत्री श्री. दिलीप वळसे-पाटील यांनी संबंधितांना दिले.

यावेळी खा.सुनील तटकरे म्हणाले की, सुमारे 8 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या दिवेआगर सुवर्ण गणेश मुखवट्याची प्रतिष्ठापना लवकरच होणार असल्याने, राज्य शासनाने याबाबत घेतलेल्या या महत्त्वाच्या निर्णयाबाबत आनंद व्यक्त केला.

Exit mobile version