| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यातील दहा नगपरिषदांच्या निवडणुकांचा निकाल रविवारी जाहीर झाला. या निवडणूकीत अलिबाग वगळता अन्य नगरपरिषदांमध्ये प्रचंड फेरबदल झाले. दहापैकी पेणमध्ये भाजप, अलिबागमध्ये शेकाप, श्रीवर्धनमध्ये उध्दव ठाकरे गट शिवसेना, उरणमध्ये महाविकास आघाडी तसेच मुरूड, रोहामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट आणि कर्जतमध्ये परिवर्तन विकास आघाडी, महाड, माथेरान, खोपोली नगरपरिषदेवर शिदें गटाचे उमेदवार निवडून आले आहेत. अलिबाग, उरण व श्रीवर्धनमध्ये विकास आघाडीचे नगराध्यक्ष बसले आहेत. त्यामुळे या निवडणूकीत महायुतीला मोठा धक्का बसला आहे.
जिल्ह्यातील अलिबाग, मुरूड, रोहा, महाड, श्रीवर्धन, पेण, खोपोली, कर्जत, माथेरान, उरण या दहा नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी अठरा दिवसांच्या दिर्घप्रतिक्षेनंतर रविवारी(दि.21) घेण्यात आली. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. अलिबाग नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अक्षया नाईक या बहुमतांनी निवडून आल्या. नगरसेवकपदाच्या वीस जागांपैकी 17 जागांवर वर्चस्व निर्माण करण्यात आले. महाविकास आघाडीतील शेकाप व काँग्रेसची सत्ता नगरपरिषदेवर कायम राहिली.
श्रीवर्धन हे खासदार तटकरे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. नगरपरिषदेच्या निवडणूकीत तटकरे समर्थक नगराध्यक्षपदाचे उमेदवार पराभूत झाले आहेत. तसेच महाडमध्ये नगरपरिषदेवर वर्चस्व निर्माण करण्यासाठी स्नेहा जगताप यांना आपल्या पक्षात घेतले. प्रचंड मोर्चे बांधणी करण्यात आली होती. या निवडणूकीत प्रचंड जोर लावला होता. परंतु खासदार तटकरे यांना श्रीवर्धनसह महाडमध्ये मोठा धक्का बसला आहे.
उरणमध्ये भाजपचे आमदार महेश बालदी यांनी या निवडणूकीत प्रचंड मेहनत घेतली होती. महाविकास आघाडीने कामगिरी चांगली केल्याने बालदी यांना निवडणूकीत चांगलाच दणका मिळाला. बालदी यांचे उमेदवार पराभूत झाले. महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून आले. त्यामुळे बालदी यांनादेखील मोठा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या निवडणूकीत मतदारांना आकर्षण करण्यासाठी भाजपने अनेक अमिष दाखविले होते. परंतु अलिबागकरांनी भाजपच्या अमिषाला बळी न पडता, शेकाप व काँग्रेसच्या उमेदवारांना बहूमतांनी निवडून दिल्याने भाजपला एकावर समाधान मानण्याची वेळ आली. अलिबाग सोडले तर अन्य नगरपरिषदेवर प्रचंड फेर बदल झाला आहे. या फेर बदलाचा फटका आगामी निवडणूकीत बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नगरपरिषदांच्या निवडणूकीत महायुतीला धक्का

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606