कोळी समाजाची सरकारकडे मागणी
| आगरदांडा | वार्ताहर |
मुरुड समुद्रकिनारा व लगत असणारी एकदरा खाडीच्या मुखाशी ग्रोयान्स बंधार्याची निर्मिती होऊन हा बंधारा लवकरात लवकर व्हावा अशी मागणी मुरुड कोळी समाजानी केली आहे.
याबाबत सागर मच्छीमार सोसायटीचे चेअरमन मनोहर बैल यांनी सांगितले की, बंधारा नसल्याने सर्वांचे नुकसान होत आहे या बंदराकरीता आम्ही गेली 9वर्ष पाठपुरावा करत आहोत. यासाठी माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांना नवापाडा कोळी समाजाने निवेदन देण्यात आले होते, पण आजतागायत त्याची पुर्तता झाली नसल्याचे बैलमारे यांनी निदर्शनास आणले.
जानकर यांनी यासाठी महाराष्ट्र मेरी टाइम बोर्ड व संबंधित खात्यांचे अधिकारी यांची एकत्रित सभा आपल्या शिष्टमंडळासमवेत घेतली जाईल व अधिकारी वर्गाच्या म्हणण्यानुसार आपल्या ग्रोयान्स बंधार्यास त्वरित मंजुरी देण्याचे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. परंतु अजूनपर्यंत कोणतीच पुर्तता झाली नाही. तरी पुन्हा आमचा शिष्टमंडळ संबंधित मंत्री महोदयांना भेटुन या ग्रोयेस बंधार्याची मागणी करु, अशी प्रतिक्रिया मनोहर बैले यांनी व्यक्त केली.
होड्यांचे नुकसान
समुद्राला ओहोटी आल्यावर बोटी किनार्याला लागणे कठीण होऊन बसते त्यामुळे होडीचे अंतोनात नुकसान होत आहे. तर मोठ्या होड्या किना-यावर येण्यासाठी कोळी बांधवाना भरतीची वाट पाहावी लागते त्यामुळे खोल समुद्रातच बोटी थांबवाव्या लागल्याने पकडलेली मासळी शिळी होऊन मच्छिमारांचे प्रचंड नुकसान होत आहे. जर का हा ग्रोयेन्स बंधारा झाला तर मच्छिमारांना मोठा दिलासा मिळणार आहे. या बंधार्यामुळे पर्यटक व मच्छिमारांचा फायदा हे तरी सदरचा बंधारा लवकरच लवकर मंजूर करून स्थानिक मच्छिमार बांधवाना शासनाने दिलासा द्यावा अशी मागणी कोळी समाजाकडून होत आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी
मुरूड शहर पर्यटन स्थळ आहे. समुद्रकिनारी शनिवारी-रविवारी शेकडो पर्यटक ये-जा करित असतात. पर्यटकांच्या सुरक्षाच्या दृष्टीने ही हा बंधारा महत्त्वाचा आहे. जेणेकरुन पर्यटकांना याठिकाणी पोहण्याचा अंदाज घेऊन त्याठिकाणी पोहता येईल. सहा वर्षापूर्वी मुरुड समुद्रकिनारी पुणे येथील अबिदा इनामदार महाविद्यालयाचे विद्यार्थी फिरण्याकरिता आले होत. त्यापैकी 14 विद्यार्थी समुद्रकिनारी पोहण्यासाठी उतरले होते. या ठिकाणी पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा त्या पाण्यात बुडवून मृत्यू झाला. जर या ठिकाणी ग्रोयान्स बंधारा असता तर ही दुर्दैवी घटना घडलीच नसती. अश्या दुर्घटना टळली असती. यासाठी बंधाराची आवश्यकता आहे.