ऑनलाईन शिक्षणात नेटवर्कचा त्रास

बोर्लीपंचतन परिसरातील पालकांमध्ये चिंता
सुमार दर्जाच्या इंटरनेट सेवेचा फटका
। बोर्लीपंचतन । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन या ग्रामीण भागामध्ये मोबाईल व इतर कंपनी देत असलेली इंटरनेट सेवा अतिशय सुमार दर्जाची असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन अभ्यासाला बसत आहे. कोरोनामुळे सध्या ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु आहे, परंतु या भागात इंटरनेट सुविधा धीम्या गतीने असल्याने ऑनलाईन शिक्षण बंद असल्याचे चित्र आहे.
या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच शासनाने ऑनलाईनद्वारे अभ्यासक्रम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन व परिसरातील गावांमध्ये नेटवर्क अतिशय सुमार दर्जाचे असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरु झालेले नाही. त्यामुळे पालक आपल्या पाल्यांचे शिक्षण कसे होईल, या विचाराने चिंताग्रस्त आहेत. यावर्षी तरी शाळा भरतील का आणि मुलांचे शिक्षण सुरळीत होईल का किंवा हे असेच सुरू राहिले तर पाल्याच्या शिक्षण कसे करावे? असे अनेक प्रश्‍न पालकांना सतावत आहेत. नुकत्याच जनता शिक्षण संस्थेने काही निवडक पालकांची सभा घेतली. यामध्ये शिक्षण ऑनलाईन सुरु नाही, मोबाईल कंपनी देत असलेल्या सुमार दर्जाच्या सेवेमुळे विद्यार्थ्यांचे अद्याप शिक्षण सुरू होत नाही, याकडे लक्ष वेधण्यात आले.
प्रशासनाने ग्रामीण भागातील नेटवर्कची सेवा सुधारण्यासाठी मोबाईल कंपनीला सूचना कराव्यात. जेणेकरून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता येईल. नाहीतर ग्रामीण व खेडेगावतील विद्यार्थ्यांना नेटवर्कमुळे शिक्षणापासून वंचित रहावे लागेल, ही चिंता पालकांना सतावते आहे. प्रशासनाने नेटवर्क सुरळीत व उत्तम दर्जाचे होण्यासाठी प्रयत्न करण्याची आग्रही मागणी पालकांमधून होत आहे.
कोट
बोर्लीपंचतन ते दिघी परिसरामध्ये विद्यार्थी पट खूप जास्त आहे. यामध्ये फक्त 20 ते 30 टक्के विद्यार्थी व पालकांकडे स्मार्टफोन उपलब्ध आहेत. तर ऑनलाईन शिक्षण देताना नेटवर्क ही एक मोठी समस्या आहे. शिक्षण विभागाकडून ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण देण्याबाबत नियोजन चालू आहे; पण ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे सर्व नियम पाळून शाळा सुरू झाल्याशिवाय शिक्षण सुरळीत होणार नाही ही वस्तुस्थिती आहे.
- शीतल तोडणकर, गटशिक्षणाधिकारी, श्रीवर्धन
कोट 2
सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु केले आहे; परंतु या भागातील नेटवर्क सतत खंडीत होत असल्याने ऑनलाईन अभ्यास होत नाही. त्यामुळे शासनाने नेटवर्कमध्ये सुधारणा करावी व जे नेटवर्क चांगले चालेल त्या कंपनीचे सीमकार्ड विद्यार्थ्यांना द्यावे.
- विजय गोविंद मोरे, पालक

Exit mobile version