महामार्गाची रेकॉर्डब्रेक रखडपट्टी

। रायगड । प्रतिनिधी ।

एक ना अनेक समस्या समोर असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचा दबाव टाकला जात आहे. कामाचा वेग, अतिक्रमण हटवण्यात येणारे अडथळे याचा विचार करता पुलाचे काम पूर्ण होण्यास किमान तीन वर्षांचा कालावधी लागणार असल्याने कोकणातील चाकरमान्यांच्या पोटात गोळा येऊ लागला आहे. एकूणच एक तपानंतरही महामार्गाचे काम अपूर्णच आहे. यामुळे गणेशोत्सवाच्या निमित्ताने महामार्गाची रेकॉर्डब्रेक रखडपट्टीने लक्ष वेधले आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कायम वादग्रस्त ठरलेल्या कासू ते इंदापूर या 42 किलोमीटरदरम्यान चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या टप्प्यातील 12 किलोमीटरवर 11 ठिकाणी उभारण्यात येणार्‍या भुयारी मार्गाचे काम केवळ 10 टक्केच झाले आहे. सर्वात मोठा अडथळा असलेल्या 1.2 किमी नागोठणे पुलाचे काम सुरू होऊन 12 वर्षे उलटली तरी जेमतेम 15 टक्केच झाले आहे. असे असताना राज्यातील नेतेमंडळी पुलाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करण्याची घोषणा करीत आहेत.

कासू ते इंदापूर रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मे. कल्याण रोडवेज या कंपनीला दिले आहे. या कामासाठी 342 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात काँक्रिटीकरणासह उड्डाणपूल, जनावरे, वाहनांसाठी भुयारी मार्गासह साईडपट्ट्या लावणे, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावण्याचे काम करावे लागणार आहे. यासाठी अनेकदा डेडलाइन देण्यात आल्या. आता नव्याने डिसेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. यात नागोठणे उड्डाणपूल महत्त्वाचा अडथळा ठरत आहे.
पुढील दोन महिन्यांत याचे काम करण्याचे उद्दिष्ट राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे. ज्या पुलाचे काम 12 वर्षे वेग घेऊ शकले नाही, ते पुढील तीन महिन्यांत कसे करायचे, असा प्रश्‍न अधिकार्‍यांना पडला आहे.

नागोठण्याजवळ कामत हॉटेलपासून सुरू होणारा हा उड्डाणपूल इंद्रप्रस्थ हॉटेलजवळ संपतो. गणेशोत्सवादरम्यान महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होते. पुलाच्या बाजूने तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या रस्त्यावरही मोठमोठे खड्डे पडले आहेत. पेव्हर ब्लॉक टाकून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न असला, तरी अवजड वाहतूक आणि सततच्या पावसामुळे पेव्हर ब्लॉक उखडले आहेत. अरुंद रस्ता, खड्ड्यामधून हेलकावणारी वाहने, पुलाच्या अपूर्ण संरक्षक भिंतीमुळे अपघाताचा धोका बळावला आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात येथे मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यासाठी वाहतूक शाखेने काही सूचना करून धोकादायक ठिकाणी दुरुस्ती करण्याची विनंती महामार्ग प्राधिकरणास केली होती; परंतु गणेशोत्सवास अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाही यात फारशी सुधारणा झालेली दिसत नाही.इंदापूरहून पनवेलच्या दिशेने येताना 11 ठिकाणी भुयारी मार्ग तयार केले जात आहेत. त्याचे काम केवळ 10 टक्केच झाले आहे. रातवड येथील रखडलेल्या पुलामुळे 700 मीटरच्या रस्त्याची अक्षरशः दैना झाली आहे. त्यापुढे कोलाड येथील उड्डाणपुलाचे काम सुरूच झालेले नाही. धाटाव एमआयडीसी आणि रोहा शहराच्या दिशेने येणार्‍या वाहनांसाठी येथे उड्डाणपूल तयार केला जात आहे. त्यानंतर म्हैसदरा येथे गेल्या महिन्यात स्टीलचे गर्डर टाकण्यात आले आहेत.

खांब गावाजवळही अशीच स्थिती आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुकाने असल्याने रस्ता अरुंद असल्याने सतत वाहतूक कोंडी होते. सुकेळी खिंडीतील डोंगर फोडून रस्ता एका समांतर रेषेत आणण्याचे काम सुरू आहे. सुकेळी खिंडीच्या पुढे अनधिकृतरीत्या सुरू असलेले हॉटेल हटवण्यात न आल्याने रस्त्याचे काम थांबल्याचे प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.

मे. कल्याण रोडवेज कंपनीची 342 कोटी रुपयांची निविदा मंजूर झाली होती. या रकमेत 42 किमीमधील सर्व कामे पूर्ण करावी लागतील. डिसेंबरपर्यंत प्राधान्याने रस्त्याचे काम केले जाणार आहे. काही ठिकाणी अतिक्रमणे आहेत, न्यायालयाच्या आदेशामुळे ही अतिक्रमणे पावसाळ्यात काढू शकत नसल्याने काही दिवस वाट पाहावी लागेल. उड्डाणपूल, भुयारी मार्ग, सेवा रस्त्याचे काम बाजूला ठेवून ही कामे केली जात आहेत.

– यशवंत घोटकर, संचालक, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण

Exit mobile version