दुहेरी मालमत्ता कराविरोधात उपोषण सुरूच

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

मालमत्ता कराचा मुद्दा हा वाद न्यायप्रविष्ठ असल्याने परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी उपोषण आंदोलन करू नये, असे आवाहन पालिकेकडून वाघमारे यांना करण्यात आले होते. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम असलेल्या वाघमारे यांनी पालिका मुख्यालयाबाहेर सोमवार (दि.11) पासून उपोषण आंदोलनाला सुरुवात केली असून, आंदोलनाचा मंगळवार (दि.12) चा दुसरा दिवस आहे. सोमवारपासून सुरु असलेल्या या आंदोलनाला परिसरातील रहिवासी, राजकीय पक्ष तसेच व्यापाऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे यावेळी पाहायला मिळत आहे.

शेकाप नेते माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, उबाठा गटाचे खांदा कॉलनी शहरप्रमुख सदानंद शिर्के, शहर समन्वयक गणेश परब, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष संतोष गवस यांच्यासह प्रहारचे ॲड. मनोज टेकाडे, संपर्कप्रमुख ॲड. अजय तापकीर, खांदा कॉलनीतील निलकंठ सदन सोसायटीचे पदाधिकारी, आपचे पदाधिकारी आदींनी उपोषणस्थळी भेट घेऊन वाघमारेंच्या उपोषणाला पाठिंबा दिला.

ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत सिडको वसाहतीत कलम 128 अ नुसार मूलभूत सेवासुविधा महापालिकेने पुरवल्या नाहीत. त्यामुळे या कालावधीत निवासी व वाणिज्य मालमत्तावरील वसूल केलेली मालमत्ताकरांची रक्कम व्याजासहित मालमत्ता धारकांना परत करावी. 1 डिसेंबर 2022 पासून मालमत्ता कर आकरणी सुरू करावी व नव्याने बिले पाठवावी. मालमत्ता करावर लावलेली शास्ती रद्द करावी आणि ऑक्टोबर 2016 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीमधील वसूल केलेली शास्ती व्याजासहित परत द्यावी. मालमत्ताधारकांना पाठविलेल्या जप्तीच्या नोटीसा रद्द कराव्यात या मागण्यांसाठी पनवेल महापालिका मुख्यालयासमोर उपोषणाला सुरूवात करण्यात आली आहे.

वाघमारे यांच्या समवेत त्यांचे पदाधिकारी गोपिचंद खरातदेखील उपोषणाला बसले आहेत. प्रशासन जोपर्यंत मागण्यांसदर्भांत सकारात्मक प्रतिसाद देत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशी भूमिका वाघमारे यांनी घेतली आहे.

Exit mobile version