बदलत्या काळातही बैलगाडीचे महत्त्व कायम

ग्रामीण भागात आजही शेतकऱ्यांची विश्वासू साथी

| आगरदांडा | प्रतिनिधी |

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एकेकाळी “सुपरफास्ट एक्स्प्रेस” मानली जाणारी बैलगाडी आजही शेतीकामात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. नागमोडी वाटा, कच्चे रस्ते किंवा शेतशिवारातून सहज मार्ग काढत मालवाहतूक करणारे हे पारंपरिक साधन आजही अनेक शेतकऱ्यांचा आधार आहे.

प्राचीन काळापासून वाहतुकीचे प्रमुख साधन असलेल्या बैलगाडीला विशेष स्थान होते. राजवटीत रथ जसा महत्त्वाचा होता, तसाच शेतकऱ्यांसाठी बैलगाडीचा उपयोग होता. घरासमोर बैलगाडी असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे. त्या काळात रस्त्यांचा अभाव असल्याने दळणवळणासाठी बैलगाडीचाच मोठ्या प्रमाणात वापर होत असे. काळानुसार तंत्रज्ञान विकसित झाले आणि विजेवर चालणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे लाकडी बैलगाड्यांची जागा लोखंडी बैलगाड्यांनी घेतली. त्यानंतर ट्रॅक्टर, रिक्षा, टेम्पो यांसारखी आधुनिक वाहतूक साधने उपलब्ध झाली. त्यामुळे शेतीची कामे वेगाने आणि सोप्या पद्धतीने होऊ लागली.तरीही, ग्रामीण भागात विशेषतः भातशेतीसाठी बैलगाडीचे महत्त्व अजूनही टिकून आहे. शेतातील पेंढा वाहणे, भात भरडणे, गवत, शेण आणि इतर साहित्याची वाहतूक करण्यासाठी बैलगाडीचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन कामात तिचे योगदान आजही महत्त्वाचे ठरते.

मात्र, बदलत्या परिस्थितीमुळे बैलगाडीची संख्या कमी होत चालली आहे. शेतीचे विभाजन, घटते उत्पन्न, नैसर्गिक आपत्ती आणि तरुण पिढीचे शेतीकडे होत असलेले दुर्लक्ष यामुळे बैलगाडीचा वापर घटला आहे. गुरेपालनासाठी लागणारा चारा व पाण्याची टंचाई, तसेच वणव्यामुळे नष्ट होणारे गवत यामुळेही शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व कारणांमुळे तालुक्यात आता मोजक्याच बैलगाड्या उरल्या असून, त्यादेखील नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तरीसुद्धा, ग्रामीण भागातील शेतीकामासाठी बैलगाडी आजही एक विश्वासू आणि किफायतशीर पर्याय म्हणून टिकून आहे.

Exit mobile version