इंग्लंडने केला सुफडा साफ; ठरला सर्वात मोठा पराभव
| नॉटिंगहॅम | वृत्तसंस्था |
भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना नॉटिंगहॅम येथे खेळला गेला. यावेळी प्रथम फलंदाजी करताना, यजमान इंग्लंडने 20 षटकांत 7 बाद 201 धावांची मजल मारली. परंतु, लक्षाचा पाठलाग करताना भारतीय संघाने अक्षरशः इंग्लंडसमोर लोटांगण घातले. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 76 धावाच करु शकला. त्यामुळे भारताचा 125 धावांनी दारुण पराभव झाला असून, हा इतिहासातील सर्वात मोठा पराभव ठरला आहे.
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजीला आलेल्या इंग्लंडच्या तीन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना चांगला चोप दिला. यावेळी फिल सॉल्टने सर्वाधिक 70 धावा ठोकल्या. तर, जॉस बटलर (36) व सॅम कुरन (नाबाद 41) यांच्या फटकेबाजीने भारतीय गोलंदाजांना हतबल केले. त्यानंतर कर्णधार हॅरी ब्रूक (16), जेकब बेथेल (13), विल जॅक्स (14), जोफ्रा आर्चर (5) यांच्या योगदानाने इंग्लंडचा संघ 7 बाद 201 धावांचा टप्पा गाठू शकला. यावेळी भारतीय संघाकडून प्रिंस यादव व हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. तर, अक्षर पटेलला 1 बळी घेता आला.
त्यानंतर इंग्लंडने दिलेल्या 201 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाच्या फलंदाजाने जणू लोटांगणचे घातले. लक्ष्याचा पाठलाग करताना वैभव सूर्यवंशी व अभिषेक शर्मा यांनी आक्रमक सुरूवात केली. परंतु, वैभव पुन्हा एकदा आपला जलवा दाखविण्यात अपयशी ठरला. त्याला यावेळी फक्त 13 धावाच धावफलकावर जोडता आल्या. त्यानंतर अभिषेक शर्माही 10 धावांवर झेलबाद झाला. इशान किशन (13), कर्णधार श्रेयस अय्यर (5) व अक्षर पटेल (10) हे बाद झाल्याने इंग्लंडने पॉवर प्लेमध्येच भारताचा निम्मा संघ 52 धावांवर तंबूत पाठवला. त्यामुळे टी-20 क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या पाच षटकांत भारताने प्रथमच पॉवर प्लेमध्ये पाच गडी गमावले. त्यांनतर लगेच तिलक वर्मा (3) यष्टिचीत झाला. जॉस बटलच्या हातून चेंडू निसटण्यापूर्वी यष्टींवर आदळल्याने त्याला बाद दिले गेले. शिवम दुबे देखील 2 धावांवर बाद झाला. पाठोपाठ अर्शदीप सिंगही (4) तंबूत परतला. त्यानंतर हर्षित राणा (9), वरून चक्रवर्थी (5) आणि पिन्स यादव (2) हे देखील स्वस्त्यात बाद झाले. त्यामुळे भारताचा डाव अवघ्या 76 धावांवर संपुष्टात आला आणि इंग्लंडने तब्बल 125 धावांनी भारतीय संघावर विजय मिळवला. त्यामुळे भारताचा हा सर्वात लाजीरवाणा पराभव ठरला आहे. यापूर्वी 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध भारत 80 धावांनी हरला होता. इंग्लंडने हा सामना जिंकून मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताची निराशजनक कामगिरी
भारतीय क्रिकेट संघ सध्या आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय इतिहासातील सर्वात निराशाजनक टप्प्यातून जात आहे. भारताने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात करून जवळपास 20 वर्षे झाली आहेत; तरीही, पहिल्यांदाच असा प्रसंग ओढवला आहे की संघ सलग पाच सामन्यांत एकही विजय मिळवू शकलेला नाही. विशेष म्हणजे, भारताचा शेवटचा टी-20 आंतरराष्ट्रीय विजय 2026 च्या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात झाला होता. तेव्हापासून संघ आपल्या पुढील विजयाच्या प्रतीक्षेत आहे. ही बाब भारतीय संघाची सध्याची स्थिती अधोरेखित करते. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंड दौऱ्यावर दोन सामने खेळले आणि दोन्ही गमावले. त्यानंतर, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला, तर पुढील दोन सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
