देवभूमी उत्तराखंड दुचाकीवर गाठले; पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवाची गरज
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
विद्यार्थ्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती आणि अध्यात्म प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगता यावे, या उद्देशाने पालीतील इतिहास विषयाचे शिक्षक चंद्रशेखर राऊत यांनी तब्बल 4 हजार किलोमीटरचा दुचाकीवरून प्रवास करत देवभूमी उत्तराखंड गाठले. 6 राज्यांतून केलेला हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव ठरला असून, या प्रवासातून त्यांनी निसर्ग, इतिहास, संस्कृती आणि माणुसकीचे विविध रंग जवळून अनुभवले आहेत.
चंद्रशेखर राऊत यांचा महाराष्ट्रातील पाली येथून सुरू झालेला हा प्रवास गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश मार्गे उत्तराखंडपर्यंत पोहोचला. यादरम्यान राजस्थानातील बाडमेर, जोधपूर, जयपूर आणि उदयपूर या ऐतिहासिक शहरांनी त्यांना जणू इतिहासाच्या पानांतच नेऊन ठेवले. भव्य किल्ले, राजवाडे, वाळवंटातील अथांग शांतता, रंगीबेरंगी संस्कृती आणि राजेशाही वैभव अनुभवताना इतिहास शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी अनेक जिवंत संदर्भ त्यांनी मनात साठवून ठेवले. जोधपूरचा मेहरानगड किल्ला, जयपूरची ऐतिहासिक वास्तुकला आणि उदयपूरचे सरोवरांचे सौंदर्य यांनी प्रवास अधिक समृद्ध केला. हरियाणा, नोएडा, गुरुग्राम, सोनीपत आणि दिल्ली परिसरातून प्रवास करताना आधुनिक भारताचा बदलता चेहरा त्यांनी अनुभवला. मात्र, या संपूर्ण प्रवासातील सर्वात भावनिक आणि आत्मिक टप्पा होता तो उत्तराखंडचा. हिमालयाच्या कुशीत वसलेली ऋषिकेश, हरिद्वार, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, सोनप्रयाग, चोपटा, केदारनाथ, बद्रीनाथ आणि तुंगनाथ ही स्थळे त्यांच्या मनावर कायमची कोरली गेली.
हरिद्वार येथे प्रथमच गंगेचे दर्शन घेताना आलेला रोमांच, ऋषिकेशमधील अध्यात्मिक शांतता, देवप्रयाग येथे भागीरथी आणि अलकनंदेच्या संगमाचे अप्रतिम दृश्य, रुद्रप्रयागचा ऐतिहासिक संदर्भ आणि चोपटाचे निसर्गरम्य सौंदर्य यामुळे हा प्रवास अधिक संस्मरणीय ठरला. ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोपटामधील हिरव्यागार दऱ्या, धुक्याने वेढलेले पर्वत आणि हिमालयाचे भव्य दर्शन पाहताना निसर्गाची खरी ताकद जाणवल्याचे त्यांनी सांगितले. केदारनाथ आणि बद्रीनाथ येथे पोहोचताना हिमालयीन घाटरस्त्यांवरील कठीण प्रवास, थंडी, पाऊस आणि अवघड वळणे यांचा सामना करावा लागला. तुंगनाथ मंदिर परिसरातील शांतता आणि हिमालयातील सूर्योदय हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षणांपैकी एक ठरला. या संपूर्ण प्रवासात अनेक अनोळखी लोकांनी दिलेली मदत, चहाच्या टपरीवरील संवाद, रस्त्यात भेटलेले प्रवासी आणि स्थानिकांचे प्रेम यामुळे “भारत हा विविधतेत एकता जपणारा देश आहे” याची प्रचिती आल्याचे राऊत यांनी सांगितले.
हा प्रवास फक्त किलोमीटरचा नव्हता; तो स्वतःला ओळखण्याचा प्रवास होता. रस्ते संयम शिकवत होते, डोंगर संघर्ष शिकवत होते आणि प्रत्येक नवीन माणूस माणुसकी शिकवत होता. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून इतिहास आणि भूगोल समजावून सांगण्यासाठी अशा प्रवासांची गरज आहे.
चंद्रशेखर राऊत,
इतिहास शिक्षक, पाली







