अतिक्रमणाविरोधातील कारवाईत भेदभावाचे आरोप; नागरिकांमध्ये संताप
| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील सेक्टर 17 मधील मंगलमूर्ती रोज बाजार भूखंडावर बेकायदेशीर टपऱ्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून शहरभर कारवाई सुरू असताना या भागात मात्र भेदभाव होत असल्याचे आरोप स्थानिक नागरिकांनी केले आहेत.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, संबंधित टपरीधारकांकडे महापालिकेचा कोणताही वैध व्यवसाय परवाना नसतानाही येथे मोठ्या प्रमाणात खाद्यपदार्थांची विक्री सुरू आहे. सायंकाळच्या वेळेत या टपऱ्यांचा विस्तार होत फूटपाथवरही स्टॉल्स लावले जातात. काही प्रकरणांमध्ये हे स्टॉल्स भाड्याने दिले जात असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. फूटपाथवर अतिक्रमण झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, रात्रीच्या वेळी येथील सांडपाणी व कचरा आजूबाजूच्या गटारांमध्ये टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता वाढत आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, या टपरीधारकांवर राजकीय वरदहस्त असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही. अतिक्रमण विभागाची गाडी परिसरात आल्यावर काही वेळासाठी फूटपाथ मोकळा केला जातो, मात्र पथक निघून गेल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमण केले जाते. याशिवाय, या मार्केटमधून महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हप्ते दिले जात असल्याच्या चर्चाही स्थानिकांमध्ये सुरू आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला असून, प्रशासन ‘धृतराष्ट्राची भूमिका’ घेत असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.







