माणगावातील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर

| माणगाव | प्रतिनिधी |

माणगाव तालुक्यातील निजामपूर बाजारपेठे ही वाढत्या अपघातांचे केंद्रबिंदू ठरली आहे. येथील अरुंद रस्त्यावरून दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या आणि स्थानिक नागरिकांच्या मनात भीतीचे सावट पसरले आहे. वाहतुकीच्या गर्दीतून मार्ग काढताना प्रत्येकाला अपघाताच्या धोक्याची जाणीव सतावत असते. नुकताच निजामपूर बाजारपेठेत पर्यटकांच्या कारने एका व्यक्तीला ठोकर देऊन अपघात केला होता. त्यामुळे बाजारपेठेसह या मार्गावर असणाऱ्या विविध गावांतील रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण व्हावे, यासाठी नागरिक अंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

निजामपूर बाजारपेठेतील हा रस्ता महाराष्ट्र रस्ते विकास मंडळाकडे आहे. या मार्गाची भौगोलिक व वाहतूकदृष्ट्या महत्त्वाची भूमिका आहे. पुणे, मराठवाडा, विदर्भातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक कोकणाच्या दिशेने याच मार्गाने येतात. विशेषतः सुट्ट्यांच्या हंगामात आणि सणावाराच्या काळात वाहतुकीचा ताण इतका वाढतो की, अरुंद रस्त्यावरून जाणे हे वाहनचालकांसाठी कसोटीचे ठरते. दुर्दैवाने, या ताणाचे रूपांतर वारंवार अपघातांत होत असून गेल्या काही महिन्यांत अपघातांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे महामार्गाचे महत्त्व मान्य आहे; परंतु, बाजारपेठेतील हा जीवघेणा अरुंद भाग कधी रुंद होणार, हा प्रश्न प्रश्नच राहिला आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास ही परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशारा नागरिक देत आहेत. नुकत्याच घडलेल्या भीषण घटनेने या प्रश्नाला अधिकच तीव्रता मिळाली आहे.

Exit mobile version