| कापोली | प्रतिनिधी |
दिवेआगर परिसरातील ‘सात उघडी’ येथील खारशेतीला लागलेले प्रशासकीय उदासीनतेचे ग्रहण दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. समुद्राच्या आणि खाडीच्या भरतीचे खारे पाणी सतत शेतात शिरत असल्याने शेकडो एकर सुपीक जमीन आज पडीक झाली आहे. विशेष म्हणजे, या भागात बोर्लीपंचतन, वडवली, कापोली आणि शिस्ते या गावांमधील गरीब शेतकऱ्यांच्या पिढ्यान्पिढ्या चालत आलेल्या वडिलोपार्जित जमिनी आहेत. जर सरकारने आताच ठोस उपाययोजना केल्या, तरच या गरीब शेतकऱ्यांची हक्काची काळी आई (जमीन) वाचू शकेल, अशी आर्त हाक स्थानिक भूमीपुत्रांनी दिली आहे.
गेली अनेक वर्षे शेतात खाडीचे पाणी साचत असल्याने आणि कोणतीही मशागत न झाल्याने दिवेआगर बांध परिसरापासून संपूर्ण खारशेतीच्या जागेवर आता ‘ल्हावी’ (एक प्रकारची पाणवनस्पती) आणि झाडीझुडपांचे साम्राज्य पसरले आहे. शेतांचे बांध नष्ट झाले असून, संपूर्ण परिसराला दलदलीचे स्वरूप आले आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, पिढ्यान्पिढ्या शेती करणाऱ्या मूळ मालकांनाही आज आपली स्वतःची जमीन नेमकी कुठे आहे, हे ओळखणे कठीण झाले आहे. ही ल्हावी आणि झुडपे साफ करण्यासाठीच हजारो रुपयांचा खर्च येणार आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेला आणि पिकाअभावी खचलेला सामान्य गरीब शेतकरी हा अवाढव्य खर्च कसा करणार? हा मोठा प्रश्न आहे. वेळीच लक्ष दिले नाही तर शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीत जातील, अशी भीती खारशेती मालकांना सतावत आहे.






