ग्रामसभेत पथदिव्यांचा विषय गाजला

डिझेलवर पाणीपुरवठा करण्याची वेळ

। नेरळ । प्रतिनिधी ।

नेरळ ग्रामपंचायतीच्या तहकूब ग्रामसभेत विजेचे दिवे आणि पाण्याची वीज याबाबत मोठा गोंधळ पाहायला मिळाला. बाजारात सहाशे रुपयांना मिळणारे विजेचे दिवे नेरळ ग्रामपंचायतीने 1680 रुपयांना खरेदी केले असून, हा सर्व घोटाळा माजी सदस्य सनी चंचे यांनी उघड केला असून, संबंधित ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा ठराव ग्रामसभेने घेतला आहे. तर, नेरळ गावाला नळपाणी योजनेची वीज जोडणी वीज बिल थकल्याने कापली असल्याची माहिती पुढे आली आहे.

नेरळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच उषा पारधी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त मंजूर करताना नेरळ गावातील आठवडा बाजार बंद करण्यात यावा या ठरावाला या ग्रामसभेत विरोध करण्यात आला. सर्वसामान्य यांच्यासाठी तो आठवडा बाजार आर्थिक पैसे वाचविण्यासाठी महत्त्वाचा असतो आणि त्यामुळे आठवडा बाजार सुरूच रहावा तसेच त्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत असल्याने आठवडा बाजार सुरू ठेवला जाईल, असे यावेळी जाहीर करण्यात आले. त्यानंतर माजी सदस्य सनी चंचे यांनी ग्रामपंचायतीने लावलेले विजेचे दिवे यांना अधिक पैसे देऊन खरेदी केले आहेत, असा आरोप केला. त्यावर ग्रामपंचायत 1680 रुपयांना एक दिवा खरेदी करीत असून, त्यापेक्षा अधिक चांगल्या कंपनीचे दिवे हे 500-600 रुपये यांना मिळत आहे. त्यामुळे मुरबाड येथील ठेकेदाराला दिलेला विजेचे दिवे पुरविण्याचा ठेका रद्द करण्यात यावा, अशी मागणी सनी चचे यांनी केली. त्याचवेळी कागदपत्रे आणि नवीन विजेचे दिवे यांची पाहणी केल्यावर शेवटी मुरबाड येथील ठेकेदाराकडून घेतलेल्या दिव्यांची रक्कम परत घेण्यात यावी तसेच त्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आणि ठराव ग्रामसभेत घेण्यात आला.

ग्रामपंचायत कर्जत प्रेस असोसिएशनकडून मागणी करण्यात आलेला कुर्‍हाड बंदी ठराव घेण्यात आला. तर या ग्रामसभेत संजय मनवे, अरविंद कटारिया, राजेश मिरकुटे, प्रवीण ब्रम्हांडे, प्रीतम गोरी, अंकुश दाभने, सावळाराम जाधव, जब्बार शेख, दिलीप बोरसे, सुमित साबळे, रोहन चव्हाण, प्रशांत देशमुख आदी ग्रामस्थांनी समस्या मांडल्या.

Exit mobile version