। पनवेल । वार्ताहर ।
खारघरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी तयार करण्यात आलेल्या हेलिपॅडवर क्रिकेट खेळाचा आनंद घेता येत असल्यामुळे ओवे गावातील मुले समाधान व्यक्त करीत आहेत.
सिडको वसाहत निर्माण होण्यापूर्वी गावातील मुले गाव आणि गावाबाहेरील जागेत क्रिकेट, कबष्ी, विटूदांडू आदी विविध खेळ खेळून खेळाचा आनंद घेत होती. ‘सिडको’ने खारघर वसाहत निर्माण करताना काही सेक्टर मध्ये मैदान तर काही सेक्टर मध्ये उद्यान उपलब्ध करुन दिले आहे. मात्र, खारघर परिसरातील गावांसाठी मैदान आणि उद्यान निर्मितीकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसते. दरम्यान, ओवे आणि तळोजा गावातील मुले फरसीपाडा लगत असलेल्या मोकळ्या भूखंडावर क्रिकेट आणि फुटबॉल खेळ खेळत होती. मात्र, गेल्या वर्षभरात सदर भूखंड ‘सिडको’ने विक्री केल्यामुळे सदर भूखंडावर इमारतीचे बांधकाम सुरु आहे. विशेष म्हणजे ओवे गावात मैदान आणि उद्यान नाही. त्यामुळे ओवे गावातील मुले खारघर कार्पोरेट पार्कसाठी राखीव असलेल्या मोकळ्या भूखंडावरील चढउतार जागेत क्रिकेट खेळून खेळाचा आनंद घेत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खारघरमधील सेंट्रल पार्कलगत असलेल्या कार्पोरेट पार्कमध्ये प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हेलिकॅप्टर उतरण्यासाठी सेंट्रल पार्क लगत असलेल्या कार्पोरेट पार्कमध्ये जमिनीचे सपाटीकरण तसेच खडी आणि डांबरीकरण करुन हेलिपॅड उभारण्यात आले होते. सध्या हेलिपॅडच्या जागेत ओवे गावातील मुले क्रिकेट खेळाचा आनंद घेत आहेत.