कर्जत स्थानकातील फलाट एकची लांबी वाढणार

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकची लांबी कमी असल्याने जास्त डबे असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या दोन वेळा थांबत असल्याने प्रवाशांचे होत असलेले हाल होणार नाहीत. कारण, कर्जत रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकची लांबी वाढविण्याचे काम फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

कर्जत रेल्वे स्थानकावर एकूण तीन फलाट व एक इएमयु फलाट आहे. फलाट क्रमांक एक वर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या येत असतात. परंतु, या फलाटाची लांबी कमी असल्याने जास्त डबे असलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या दोन वेळा थांबविल्या जातात. त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप धावपळ व हाल होतात. या गडबडीत अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतेच कर्जत रेल्वे स्थानकावर डब्याची स्थिती दर्शविणारे छोटे इंडिकेटर्स बसविण्यात आले आहेत. दोन वेळा गाडी थांबत असल्याने रेल्वे प्रशासनाला एकाच ठिकाणी डबे दर्शविणारे दोन इंडिकेटर्स बसवावे लागले आहेत. त्यामुळे प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होतो व कधी कधी गाडी चुकते, तर कधी सामान फलाटावरच राहते.

या होणाऱ्या त्रासाबद्दल कर्जत येथील सामाजिक कार्यकर्ते पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे फलाट क्रमांक एकची लांबी त्वरित वाढण्याचे काम पूर्ण करावे, अशी विनंती केली होती. यावर रेल्वे प्रशासकडून सदर कामासाठी ठेकेदाराची नेमणूक केली आहे व सदर कामाला पावसामुळे उशीर होत आहे, असे ओसवाल यांना कळविले होते. ओसवाल यांनी पुन्हा आपला पाठपुरावा सुरूच ठेवला व सदर काम साधारण कधीपर्यंत पूर्ण होईल, असे विचारल्यानंतर सदर काम फेब्रुवारी 2026 पर्यंत पूर्ण होईल, असे ओसवाल यांना कळविले आहे.

Exit mobile version