| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकात फलाट दोन आणि ईएमयू फलाटावर मुंबई दिशेकडे प्रचंड प्रमाणात काळोख असतो. त्या भागातील विजेचे दिवे अगदी मंद प्रकाश देत असल्याने कर्जत स्थानकात अंधार दाटलेला दिसत असून, महिला प्रवाशांची सुरक्षा समोर आली आहे.
मध्य रेल्वेवरील मुंबई पुणे मेन लाईनवरील मध्यवर्ती असलेले रेल्वे स्थानक म्हणून कर्जत रेल्वे स्थानक ओळखले जाते. या स्थानकातून पुण्याकडे जाणार्या सर्व मेल एक्स्प्रेस गाड्यांना अतिरिक्त इंजिन लावण्यात येते. पूर्वी कर्जत रेल्वे स्थानक हे जंक्शन रेल्वे स्थानक होते. मात्र, खोपोली येथे जाणार्या गाड्या उपनगरीय लोकल गाड्या म्हणून थेट जाऊ लागल्याने कर्जत स्थानक हे जंक्शन स्थानक राहिले नाही. मात्र, कर्जत रेल्वे स्थानकाचे महत्त्व मोठे असून, मेल एक्स्प्रेस गाड्यांचा थांबा पुण्याकडे घाट सेक्शनमध्ये जाताना घ्यावा लागत असल्याने कर्जत स्थानकाचे महत्त्व मोठे आहे. मध्य रेल्वे मेन लाईन मार्गावरील कर्जत मुख्य स्थानक असून, मुंबई आणि पुणे या दोन्ही महानगरांच्या मध्यभागी असलेले स्थानक म्हणून वेगळी ओळख आहे.
कर्जत स्थानकातून मुंबईकडे जाणार्या उपनगरीय लोकल पहाटे अडीचपासून रात्री अकरापर्यंत सुरू असतात. मात्र, असे असतानादेखील कर्जत स्थानकात असुविधा यांची वानवा दिसून येत आहे.कर्जत स्थानकात फलाट दोन आणि इएमयू फलाट वरील मुंबई दिशेकडे प्रवासी वर्गाला उन्हा तान्हात उभे राहावे लागते.निवारा शेड नसल्याने दिवसभरात प्रवास करणारे प्रवाशांचे हाल होत असतात. मात्र, सायंकाळनंतर येणारे प्रवासी यांना काळोखाचा त्रास सहन करावा लागतो. कर्जत स्थानकातील ईएमयू फलाट आणि दोन नंबरच्या फलाटावरील विजेचे दिवे हे अंधुक प्रकाश देणारे आहेत. त्यामुळे कर्जत स्थानकात उपनगरीय लोकलची वाट पाहत बसणारे प्रवासी यांना अंधारात उभे राहावे लागते. त्याचवेळी महिला प्रवासी यांना अंधारात उभे राहात लोकलची वाट पाहावी लागल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मध्य रेल्वेकडून बहुसंख्य स्थानकात एलईडी दिवे लावले आहेत. मात्र, कर्जत स्थानकात दिव्यांच्या खालीदेखील उजेड नसल्याने महिला प्रवाशांची कुचंबना होत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने विजेचा प्रश्न सोडविण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.