मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’वर थांबाल, तर होईल मोठा दंड
। पाली/बेणसे । प्रतिनिधी ।
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील बहुप्रतिक्षित ‘कनेक्टिंग लिंक’ (मिसिंग लिंक) प्रकल्पाचे लोकार्पण झाल्यानंतर पर्यटकांची या मार्गावर मोठी गर्दी होत आहे. मात्र, या हायवेवर वाहने थांबवून सेल्फी, फोटो आणि रिल्स काढण्याचे प्रमाण वाढल्याने प्रशासनाने आता कठोर पवित्रा घेतला आहे. केबल स्टेड ब्रिज आणि बोगद्याजवळ रेंगाळणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली जात असून, नियम मोडणाऱ्यांना मोठा दंड आकारला जाणार आहे.
‘मिसिंग लिंक’ प्रकल्पातील भव्य केबल स्टेड ब्रिज आणि आधुनिक बोगदे प्रवाशांचे आकर्षण ठरत आहेत. मात्र, हा द्रुतगती मार्ग असून येथे वाहने थांबवण्यास सक्त मनाई आहे. वेगाने येणाऱ्या वाहनांमुळे भीषण अपघाताचा धोका संभवतो. याच पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, केवळ फोटोसाठी स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालू नका.
कनेक्टिंग लिंक हा प्रकल्प प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी बनवला आहे. येथे पर्यटनासारखे वागणे अपघाताला निमंत्रण देणारे ठरू शकते. सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी नियमांचे पालन करा. असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ तर्फे करण्यात आले आहे.
24 तास सीसीटीव्हीची नजर
या प्रकल्पातील दोन्ही बोगदे आणि पुलांवर 24x7 सीसीटीव्ही यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गाड्यांचे क्रमांक तात्काळ नोंदवून त्यांच्यावर महामार्ग पोलिसांमार्फत कारवाई केली जात आहे. बेजबाबदार वर्तन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वेग मर्यादेचे पालन बंधनकारक
महामार्ग पोलिसांनी अधिसूचनेद्वारे या नवीन लिंकसाठी वेग मर्यादा जाहीर केली आहे.
हलकी मोटार वाहने : ताशी 100 किमी. बस व प्रवासी वाहने: ताशी 80 किमी.
प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना
महामार्गावर कोठेही वाहन थांबवू नका.
बोगद्यात किंवा पुलावर सेल्फी, रिल्स काढणे कायद्याने गुन्हा आहे.
वेगमर्यादेचे उल्लंघन करू नका.
तातडीची मदत लागल्यास महामार्ग पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
