वाढत्या थंडीसाठी बाजारपेठाही सज्ज

| पनवेल । वार्ताहर ।
पाऊस लांबल्याने यंदा थंडीचे आगमन देखील उशिरा झाले आहे. अशातच सध्या हवेत गारठा जाणवू लागल्याने बाजारात उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू झाली आहे. नवी मुंबई, पनवेलमधील बाजारपेठा, मॉलमध्ये देशभरातून आलेल्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. दरवर्षीपेक्षा यंदा थंडी उशिरा जाणवू लागली आहे. पण थंडीपासून बचाव होण्यासाठी नव्या पद्धतीचे स्वेटर्स व जॅकेटसहित इतर उबदार कपडे बाजारात दाखल झाले आहेत. थंडी वाढल्याने जॅकेट, स्वेटर, कान टोप्या, शाल, स्वेटर्स यांची खरेदी जोर धरू लागली आहे.

पुढील काळात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे उबदार कपडे खरेदी करण्यासाठी ग्राहकांची लगबग दिसून येत आहे. सकाळी फिरायला जाताना गरम कपडे, मफलर, कानटोपी वापरताना नागरिक दिसू लागले आहेत. त्यामुळे बाजारात जॅकेट, स्वेटर्स, बिनबाह्यांचे स्वेटर्स, महिलांसाठी लोकरी कोट, लहान मुलांसाठीचे जॅकेट्स असे विविध प्रकार उपलब्ध आहेत; मात्र यात बुलबुल, फैदर, मखमल या प्रकारांना अधिक पसंती मिळत आहे.

किंमतींमध्ये 10 टक्क्यांनी वाढ
साधारणपणे नोव्हेंबर अखेरीस थंडी पडायला सुरुवात होते. डिसेंबरमध्ये थंडीचा कडाका जाणवू लागतो. मात्र यंदा नोव्हेंबर महिन्याचा प्रारंभ सो़डला तर त्यांनतर मात्र थंडीने हुलकावणी दिली होती. पण गेल्या आठवड्यापासून हवेत गारवा जाणवू लागला असून यंदा गरम कपड्यांमध्ये असंख्य नवीन प्रकार बाजारात विक्रीस उपलब्ध असून गेल्या वर्षाच्या तुलनेत किमतीत यंदा 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Exit mobile version