चिरनेरच्या गोदामातून मार्केटींग मॅनेजरनेच केला कोट्यावधी रुपयांचा माल लंपास

। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील चिरनेर येथील मामाश्री या गोदामातून कोट्यावधी रूपये किंमतीच्या सात कंटेनरच्या चोरीचा प्रकार घडला असून गोदामात काम करणाऱ्या मार्केटींग मॅनेजरने अलिम शेख ही चोरी केली आहे. या गोदामातून 1 कोटी 38 लाख 74 हजार 240 रूपये किंमतीचा माल चोरी झाला आहे.

जेएनपीटीच्या अनुषंगाने आयात निर्यात माल साठविण्यासाठी उरण तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात गोदामे तयार झाली आहेत. या गोदामांना कस्टम विभागाने परवानगी देताना कोणतीही काळजी घेतली नसल्याने गोदाम म्हणजे चोरांचे अड्डेच झाले आहेत. शिवाय या गोदामामध्ये कोणता माल, शस्त्रास्रे, स्फोटके आहेत याबाबत कोणत्याही सुरक्षा यंत्रणांना माहिती नसते. त्यामुळे अशी गोदामे हे अनैतिक उद्योगांचे अड्डे ठरले जातात. चिरनेर परिसरात देखिल अशा प्रकारची अनधिकृत गोदामे तयार झाली आहेत. चिरनेर येथिल मामाश्री या गोदामातून मागील जून महिन्यात ही चोरीची घटना घडली. या मामाश्री गोदामातून शेरलीन कंपनीच्या कॅनव्हास शूज, मॅजिक क्यूब, बेबी करेज, फुट स्क्रबर, प्लास्टीक सोप बॉक्स, कॉस्मेटीक, ग्लड क्रीम आदींची सुमारे 1 कोटी 38 लाख 74 हजार रूपये किंमतीची चोरी झाली आहे.

अलिम शेख याने मामाश्री गोदामातील पावत्या व इतर कागदपत्रे चोरीने घेऊन हे सात कंटेनर बाहेर काढण्यासाठी लागणारी कस्टमची परवानगी मिळवली होती. त्यानंतर त्याने हे कंटेनर गोदामाच्या बाहेर काढले. याबाबतची कणकण कंपनीच्या मालकांना आणि कस्टम विभागाला लागल्यानंतर त्याने हे कंटेनर मालासहीत परत आणण्याचे कबूल केले होते आणि त्या मालातील 350 कार्टून परत आणून दिले होते. मात्र माल ठेवलेल्या पार्ट्यांना त्यांचा माल मिळाला नसल्याने कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता त्या तपासात मालाचा अपहार झाला असल्याचे उघड झाले. त्यानंतर कपंनीचे मालक अरविंद गेहलोत यांनी याबाबत उरण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास सुरु आहे.

Exit mobile version