झाकलेली मशाल पुन्हा सुस्थितीत

जनमानसाच्या रेट्यामुळे माथेरान प्रशासनाला जाग

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत विधानसभा मतदार संघात येणार्‍या माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाकडून आचारसंहितेत हुतात्म्यांची असलेली क्रांती ज्योत ही झाकण्यात आली होती. मात्र, निवडणुकीची आचारसंहिता शिथिल झाल्यावरदेखील ती खुली करण्याचा विसर पडल्याचा प्रकार समोर आला असून माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाला हुतात्मांच्या क्रांती मशालीचा विसर पडल्याबद्दल माथेरानकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जनमानसाच्या रेट्यानंतर माथेरानमधील हुतात्मा स्मारकात असलेली मशाल पुन्हा सुस्थितीत आणली गेली आहे.

माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेने हुतात्मा भाई कोतवाल व हिराजी गोमाजी पाटील यांच्या हुतात्मा स्मारकाजवळ असलेली क्रांती ज्योत ही माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेकडून झाकण्यात आली होती. निवडणूकी दरम्यान महाविकास आघाडीकडून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार रिंगणात असल्याने आणि त्या उमेदवाराची निशाणी ही मशाल असल्यामुळे ती झाकण्यात आली होती. राज्यात आचारसहिंता संपली तरी माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात हुतात्मा झालेले भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या स्मारकात असलेली क्रांती ज्योत झाकून ठेवण्यात आलेली होती. यामुळे माथेरान शहरातील नागरिकांनी माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाच्या बेजबाबदारपणाच्या विरोधात नाराजी व्यक्त केली होती.

माथेरान येथील हुतात्मा स्मारकात असलेली क्रांती ज्योत ही आचारसंहिता संपली असताना खुली करण्याचा विसर हा माथेरान गिरिस्थान नगरपरिषद प्रशासनाला पडला आहे. या प्रशासनाला देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्मा भाई कोतवाल, हुतात्मा हिराजी पाटील यांच्या हौतात्म्याचे काही एक पडलेल नाही. त्यांचा बेजबाबदारपणा समोर येत असल्याने अशा प्रशासनाचा आम्ही माथेरानकर म्हणून निषेध व्यक्त करीत आहोत, अशी माहिती सुभाष भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, ती मशाल कोणत्याही राजकीय पक्षाचे चिन्ह असले तरी क्रांतीचे प्रतीक असल्याने त्याबद्दल पालिका प्रशासन उदासीन असल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत होती.

Exit mobile version