चवदार तळ्याच्या आंदोलनातून समतेचा संदेश

हर्षवर्धन सपकाळ यांचे प्रतिपादन

| चिरनेर | प्रतिनिधी |

चवदार तळ्याचा सत्याग्रह बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली दि.20 मार्च 1927 रोजी झाला. अस्पृशांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी, सामाजिक समतेसाठी हा लढा झाला होता. त्या सत्याग्रह आंदोलनाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने महाड येथे चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्षे सोहळ्याचे औचित्य साधून, शुक्रवारी (दि.20) महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, चवदार तळ्याच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेकांचा सहभाग होता. त्या आंदोलनातून समतेचा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य निर्माण केले. तेव्हा समता, बंधुता, न्याय यांची खऱ्या अर्थाने पायाभरणी केली. महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी तोच वसा पुढे नेला. त्यातूनच पुढे संविधानाची निर्मिती झाली. आज सर्वधर्मसमभावाच्या विचारानेच काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. यातून माणसाने माणसाशी कसे वागावे, हा संदेश मिळतो, असे सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी, बाबासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मीयांचे अनुयायी होते. आजचा काळ फार कठीण आहे. आजच्या सत्ताधीशांची सत्तेसाठी जी तंत्रे वापरली आहेत. त्यात पोटात भूक आणि डोक्यात भीती, जातीभेद याचा अवलंब केला आहे. आजच्या सत्ताधीशांचा खोटे बोलण्यात कुणी हात धरू शकत नाही. ते प्रचंड भ्रष्टाचारी आहेत, असे त्या म्हणाल्या. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र घरत, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह समाजातील अन्य मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version