काळ्या डोंगरावर सोन्याची झालर; निसर्गाची किमया पाहण्यासाठी पर्यटकांची धाव
| कर्जत | प्रतिनिधी |
पावसाळा सरताना हरित तृणांची पसरलेली मखमालीचे डोंगर सर्वत्र दिसतात; मात्र, ऑक्टोबर महिन्यात माथेरानमध्ये निसर्गाची वेगळीच किमया पहावयास मिळते. माथेरान या डोंगरावर वसलेल्या पर्यटन स्थळावर पावसाळी हंगाम संपत असताना हिरव्यागार गवताच्या आजूबाजूला सोनकीच्या पिवळ्या धमक फुलांचा बहर वाढला आहे. त्यामुळे येथील अनेक हिरवेगार डोंगर पिवळा साज चढवून सोन्यासारखे दिसत आहेत. त्यामुळे माथेरानवर प्रेम करणारे काही दर्दी पर्यटक आणि निसर्गप्रेमी हे पिवळा धमक डोंगर आपल्या दृष्टीत साठविण्यासाठी माथेरानमध्ये येत आहेत.
पावसाळी पर्यटन हंगाम संपल्यानंतर ऑक्टोबरमध्ये निसर्गामध्ये आमूलाग्र बदल होताना हमखास दिसतात. परतीचा पाऊस झाल्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात सूर्यकिरण माथेरानच्या भूमीला स्पर्श करतात. काही ठिकाणी रिमझिम पाऊस त्यामध्ये डोंगरावर दिसणारे इंद्रधनुष्य पाहून पर्यटक अतिशय आनंदी होत असतात. मात्र, ऑक्टोबरमध्ये नवरात्रीच्या काही दिवस अगोदर माथेरानच्या सातशे हेक्टरमध्ये सभोवताली पिवळ्या फुलांनी डोंगराचे रुपडे पालटून जाते. या फुलांना सोनकी किंवा छोटे सुर्यफूल असे म्हणतात. माथेरानच्या डोंगरामध्ये असणारे सफेद फेसळालेले धबधबे, हिरवे गवत आणि त्यामध्ये आलेली ही सोनकी एक निसर्गाचे वरदानच आहे. ज्यावेळेस या सोनकीच्या फुलांवर सूर्यकिरण पडतात त्यावेळी संपूर्ण डोंगर हा सोन्यासारखा दिसतो. हे दृश्य अतिशय विलोभनीय असल्याने ज्या पर्यटकांना या महिन्याची किमया माहिती आहे, ते आवर्जून पाहण्यासाठी माथेरानमध्ये येतात. नैसर्गिक आलेल्या या फुलांना सुगंध जरी नसला तरी लांब डोंगरावर ती फुलल्यावर सर्वत्र पसरल्यानंतर हिरव्या डोंगराचे पिवळ्या रंगामध्ये रूपांतर होते. हे दृश्य नवरात्री होईपर्यंत ‘याची डोळा’ पाहण्याची संधी पर्यटकांना मिळते. तसेच, या फुलांवर फुलपाखरांचे थवे बागडताना हमखास दिसतात. यावेळी फुलपाखरांसह चतुर यांच्यात स्पर्धा सुरू आहे की काय, असा भास देखील होतो. हा सोनाकीच्या फुलांचा आणि फुलपाखरांचा लपंडावाचा खेळ फक्त 20 दिवस चालतो. त्यामुळे या दिवसांत निसर्ग अभ्यासक हे दृश्य अगदी जवळून न्याहाळतात. त्यानंतर ही सर्व फुले कोमेजून जातात आणि पुन्हा काही ठिकाणचा डोंगर हिरवा तर काही ठिकाणी पांढरा दिसू लागतो.
माथेरानमधील बहुतांश पाईंटवरून ही सोनेरी दुश्य दिसते. त्यामुळे राज्यातील विविध भागांतून आलेले पर्यटक देखील माथेरानमध्ये आल्यानंतर हमखास या पॉईंटवर जातात. बहुतांश पर्यटक माथेरानमधील बाजारपेठेपासून जवळच असलेल्या इको पॉईंटवरून हे दृश्य न्याहाळत असतात. या ठिकाणावरून दिसणारी उंचसखल झाडी, खाली काळ्या कातळाचा दगड, त्यावर हिरवे तृण आणि या तृणांमध्ये उगवलेली सोनकीची सोनेरी फुले हे मनमोहक दृश्य सर्वांचेच लक्ष वेधून घेते.
