। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जतमधील मुस्लिम कब्रस्तानात बेवारस प्रेत पूरत असल्याबाबत येथील मुस्लिम समाजाने फेब्रुवारीपासून सर्व शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार केले आहेत. मात्र, अद्याप कुठल्याच प्रकारचे समाधानकारक उत्तर कोणत्याही कार्यालयाने दिले नसल्यामुळे सोमवारी (दि.19) मुस्लिम समाजाने आमरण उपोषण सूरू केले आहे.
कर्जत येथील लोकमान्य टिळक चौकात मुस्लिम समाजाच्यावतीने युसुफ आश्रफ खान आणि लियाकत अली इबादअली खान हे दोघे आमरण उपोषणाला बसले आहेत. आमच्या मुस्लिम समाजाचे कब्रस्तान (दफनभूमी) कर्जत रेल्वे लाईनच्याजवळ आणि उल्हास नदीच्या काठावर आहे. गेली दोन ते तीन वर्षापासून येथे बेवारस प्रेत पुरण्याचे काम सुरू आहे. मुस्लिम समाजाच्या व्यतिरिक्त कुठल्याही समाजाला या कब्रस्तानामध्ये प्रेत पुरण्याचा अधिकार नाही, त्यांची चौकशी व्हावी. असे काम करणार्या दोषी व्यक्तीला किंवा यामध्ये असले काम करून घेणार्याला तसेच मुस्लिम समाजाच्या भावनांशी खेळणार्या, आपापसात तेढ निर्माण करणार्या दोषीला शिक्षा व्हावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.