सांडपाणी विहिरीत झिरपले; सावरोलीतील आदिवासींचे आरोग्य धोक्यात
| खोपोली | प्रतिनिधी |
सावरोली गावाजवळ एका खासगी जागेत बिनधास्तपणे माती भराव करून थेट नैसर्गिक नाला अडवल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या नाल्यातून वाहणारे सांडपाणी अडवल्याने ते तुंबून विहिरीत झिरपले असून, हेच दूषित पाणी पिण्यासाठी वापरले जात असल्याने सावरोलीतील आदिवासी बांधवांचे आरोग्य गंभीर धोक्यात आले आहे.
सावरोली ग्रामपंचायत हद्दीत आदिवासी कुटुंबांनी स्थलांतर करून ‘नवीन पवई आदिवासीवाडी’ वसवली असून, येथे सध्या 16 ते 17 कुटुंबे वास्तव्यास आहेत. ग्रामपंचायतीने पाण्याची टाकी बसवली असली, तरी पाणी अपुरे असल्याने ग्रामस्थांना विहिरीच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
दरम्यान, नैसर्गिक नाल्यावर माती भराव केल्यामुळे सांडपाणी तुंबून राहिले असून, ते झिरपून थेट विहिरीत साठत आहे. परिणामी, आदिवासी वाडीत लहान मुलांसह अनेक नागरिक आजारी पडत असून, साथीचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे.
या प्रकाराची माहिती लोकप्रतिनिधींना तोंडी स्वरूपात देण्यात आल्याचे रामदास शंकर पवार, दत्ता पवार, चंद्रकांत पवार, संजय वाघमारे, पिंकी पवार, सीता वाघमारे यांच्यासह आदिवासी महिलांनी सांगितले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.
दरम्यान, संबंधित माती भराव करताना शासनाची किती रॉयल्टी भरली आहे, याचीही चौकशी करावी, तसेच आदिवासी बांधवांना वेठीस धरून त्यांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आदिवासी ग्रामस्थांनी केली आहे.
नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण करून आदिवासींच्या जीवाशी खेळ सुरू असताना प्रशासन डोळेझाक करणार का, की तातडीने कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.







