ग्राऊंड रिपोर्ट सादर; शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यावरण संवेदनशील पर्यटनस्थळी पर्यटक आणि स्थानिकांच्या वाढत्या गरजांच्या पार्श्वभूमीवर किमान 112 पर्यावरणपूरक ई-रिक्षांची आवश्यकता असल्याचा निष्कर्ष ताज्या ग्राऊंड रिपोर्टमधून समोर आला आहे. शासनाने हा अहवाल मान्य केल्यास पर्यटकांना तासन्तास प्रतीक्षा करण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार माथेरानमध्ये पारंपरिक हातरिक्षा बंद करून पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. मात्र, सध्या अवघ्या 25 ई-रिक्षा कार्यरत असल्याने पर्यटक, स्थानिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्यक्ष परिस्थितीचा अभ्यास करून ग्राऊंड रिपोर्ट तयार करण्याचे निर्देश दिले होते.
या अहवालात दररोज ये-जा करणारे सुमारे 400 पर्यटक, शासकीय कर्मचारी, कचरा व्यवस्थापन कर्मचारी तसेच तिन्ही शाळांतील 385 विद्यार्थी व शिक्षक यांची वाहतूक ई-रिक्षांवर अवलंबून असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शनिवार-रविवार वगळता दररोज सुमारे 5 हजार पर्यटक माथेरानमध्ये ये-जा करतात, तर सुट्ट्यांच्या काळात ही संख्या 10 हजारांपर्यंत पोहोचते.
ब्रिटिशकालीन हातरिक्षा ही अमानवीय प्रथा असल्याचा मुद्दा उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना सरन्यायाधीश भूषण गवई यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी हातरिक्षा चालकांचे पुनर्वसन करून त्यांना सहा महिन्यांत ई-रिक्षा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच आदिवासी महिला आणि गरजू घटकांनाही या योजनेत समाविष्ट करण्याचे निर्देश दिले.
ई-रिक्षांची अचूक संख्या ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाच्या सनियंत्रण समितीकडे असून, स्थानिक गरज आणि पर्यटकांची संख्या लक्षात घेऊन निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर माथेरान श्रमिक रिक्षा संघटनेने चार्टर्ड अकाऊंटंट संदेश कदम यांच्या मदतीने सविस्तर अभ्यास करून हा ग्राऊंड रिपोर्ट तयार केला आहे.
माथेरानमध्ये सध्या 300 टॅक्सी आणि सुमारे 500 घोडे उपलब्ध असताना ई-रिक्षांची संख्या अत्यल्प आहे. परिणामी, पर्यटकांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते, तर विद्यार्थ्यांना गर्दीत प्रवास करावा लागतो. वाढती पर्यटकसंख्या, दरवर्षी होणारी सरासरी 10 टक्के वाढ आणि अधूनमधून होणारा वीजपुरवठा खंडित होण्याचा विचार करता किमान 112 ई-रिक्षा आवश्यक असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरवर्षी पर्यटकांची दहा टक्के वाढ
2023 : 8,90,159
2024 : 9,84,656
2025 : 10,18,432
माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र ई-रिक्षांची संख्या अत्यंत कमी असल्याने पर्यटक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्राऊंड रिपोर्टनुसार किमान 112 ई-रिक्षांची गरज स्पष्ट झाली आहे. शासनाने हा अहवाल तात्काळ मान्य करून आवश्यक परवानग्या द्याव्यात, जेणेकरून पर्यावरणपूरक आणि सुलभ वाहतूक व्यवस्था निर्माण होईल.
सुनील शिंदे,
सामाजिक कार्यकर्ते
